विजय विजापूरे
बºहाणपूर : अभ्यासक्रमाचे ऑडिओ क्लीप मागवून ते मेमरीकार्डमध्ये डाऊनलोड करून हेडफोनद्वारे ऐकून अभ्यास केला़ अभ्यासातील सातत्यामुळे १२ वी परीक्षेत दृष्टीहिन कुंती शिरशाड हिला ८३़६९ टक्के गुण मिळाले़ तिने करजगी केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ अभ्यासाबरोबरच तिला गायन, संगीत आणि कवितेचाही छंद असल्याचे कुंती शिरशाड हिने सांगितले.
केगाव बुद्रुक (ता़ अक्कलकोट) येथील श्री मल्लिकार्जुन कनिष्ठ महाविद्यालयातील ती विद्यार्थिनी आहे़ कुंती ही जन्मापासूनच दोन्ही डोळ्याने अंध आहे़ तिची १२ वीची परीक्षा ब्रेल लिपीत नाही तर अन्य मुलींप्रमाणे लेखनीकच्या मदतीने झाली़ ती अंध असूनही रोज कॉलेजला जात होती़ शिक्षकांनी शिकविलेला अभ्यास आणि पालकांनी अभ्यासाचे आॅडिओ कॅसेट मागून ते मेमरीकार्डमध्ये डाऊनलोड करून हेडफोनद्वारे अभ्यास ऐकविला. यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूपच परिश्रम घेतले़ वडील साहेबगौडा शिक्षक आहेत व आई सरोजनी यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्याने तिला या दोघांकडून खूप मदत होत असे़ तिचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न असून त्या दृष्टीने आतापासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे.
कुंती अभ्यासाबरोबरच घरकामही करते़ शिवाय संगीत, गायन, कविता लिहिणे हे छंद तिने जोपासले आहेत़ तिच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.