नारायण चव्हाणदक्षिण सोलापूर : बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला अन् अनेकांच्या भुवया उंचावल्या. केगाव (बु.) येथील जन्मतः अंधत्वाचा शाप मिळालेली कुंती शिरसाड ही करजगी केंद्रातून सर्वप्रथम आली. शाळेत न जाता तिनं मिळविलेल्या यशानं सर्वांना चकित केले. आई-बाबांच्या भक्कम पाठबळामुळेच तिने हे यश मिळवलंय. कलेक्टर बनण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं आहे.
वडील साहेबगौडा शिरसाड (माध्यमिक शिक्षक) यांचा तिच्या यशातील वाटाही तितकाच मोलाचा होता. कुंती शिरसाड ही जन्मजात दोन्ही डोळ्यांनी अंध असून, तिच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देता यावे म्हणून तिच्या आई-बाबांनी तिच्यानंतर दुसरे अपत्य होऊ दिले नाही. मुंबईच्या नॅब संस्थेकडून आठवीपासून तिच्या पालकांनी अभ्यासाची ऑडिओ कॅसेट मागविली. अभ्यासासोबतच कुंती कविताही लिहिते. शिवाय संगीताच्याही परीक्षा देत आहे. कुंतीच्या यशात तिच्या शिक्षकांबरोबरच तिची आई सरोजनी आणि वडील साहेबगौडा शिरसाड यांचा वाटा आहे.
बारावीच्या परीक्षेत करजगी केंद्रात ती सर्वप्रथम आली. तिने ८३.६९ टक्के गुण मिळवत सर्वांना अचंबित केले. पुढील शिक्षणासाठी कुंती मुंबईमधील महाविद्यालयात प्रवेश घेणार असून, यापुढील महाविद्यालयीन परीक्षा लेखनिकाच्या मदतीशिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:च लिहिण्याचा निर्धार तिने केला आहे.
‘लोकमत’शी बोलताना ती म्हणते , मला भविष्यात आयएएस व्हायचे आहे. आतापासूनच स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली आहे. पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवून माझ्यासारख्या गरजूंना मदत करायची आहे. अंध व्यक्तींना उपयोगी पडतील अशी ‘ब्रेलमी’ आणि ‘किबो रीडर’ यांसारखी अत्याधुनिक साधने घेण्याची तयारीही तिच्या आईंनी दर्शविली. पुढील शिक्षणासाठी कुंतीला मुंबईला पाठविण्याचा निर्णय आई-वडिलांनी घेतला आहे.
कुंती आमचं सर्वस्व आहे. ती ध्येयवादी आहे. तिचं आयुष्य सुंदर घडवण्यासाठी हवं ते करण्याची आमची तयारी आहे. आमची सारी स्वप्नं ती नक्की पूर्ण करेल.
- साहेबगौडा शिरसाड,
कुंतीचे वडील
सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये बी.ए.च्या वर्गात मी प्रवेश घेतला. ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची पूर्ण तयारी आहे. माझ्यासह आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न आहे. अंधत्व माझ्यासाठी कधीच अडथळा वाटत नाही.-कुंती शिरसाड