दीपक दुपारगुडे, सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील ९ गावांसाठी महत्त्वाचा असणारा तिसंगी-सोनके तलाव १०० टक्के भरून घेण्यात यावा. या मागणीसाठी मंगळवार, दि. १० रोजी पंढरपूर-पुणे रोडवर वाखरी येथे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तलाव भरण्यास दिरंगाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून तलाव न भरता बंद केल्यास १६ ऑक्टोबरपासून पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालासमोर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी दिला. दरवेळी नीरा देवघर, भाटघर धरण भरल्यानंतर तलाव १०० टक्के भरून घेतला जातो. यंदा मात्र लोकप्रतिनिधी अणि अधिकाऱ्यांनी सोयीची भूमिका घेतल्याने तलाव अद्याप भरलेला नाही. तलाव भरण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात, असा सवाल समाधान फाटे यांनी उपस्थित केला.
यावेळी विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील, माजी उपसभापती विष्णू बागल, विठ्ठलचे संचालक समाधान काळे, शेतकरी नेतेे समाधान फाटे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, युवासेनेचे रणजित बागल, सचिन आटकळे, अतुल फाटे, सुधाकर फाटे, जोतीराम पोरे, नितीन बागल, श्रीरंग नागणे, शिवाजी नागणे, मारुती पोरे उपस्थित होते.