सोलापूर: माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूज, माळशिरस, नातेपुते व वेळापूर या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. माळशिरस तालुक्याच्या सीमेवर सहा ठिकाणी नाकाबंदी करण्याबरोबरच तडीपारीचे प्रांताधिकारी यांच्याकडे १०, पोलिस अधीक्षकांकडे ३, असे एकूण १३ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तसेच ७४९ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने नुकतीच सोलापूर, सातारा, पुणे ग्रामीण पोलिसांची नुकतीच जिल्ह्याच्या सीमेवरील बंदोबस्ताबाबत बैठक पार पडली. या बैठकीत फरार आरोपी, तडीपार केलेले आरोपी, अवैध दारू, गुटखा, जुगार यामधील आरोपींच्या नावांची देवाणघेवाण करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तालुक्यातील परवानाधारक शस्त्र जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एकूण ८७४ परवानाधारक शस्त्रांपैकी ३२० शस्त्र जमा करण्यात आली आहेत.
मागील ५ वर्षांत निवडणूक काळात दाखल झालेल्या ३२ गुन्ह्यांतील १९८ आरोपींवर ‘एलसीबी’कडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्यावर दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, अशा तब्बल ५५१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.