'लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात ‘लोकमत व एनआयटी कॉम्प्युटर मित्रपरिवार यांच्यातर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून कोरोनाच्या महामारीतही ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान केले. यावेळी शतकवीर रक्तदाते शशिकांत दुनाखे यांनीही रक्तदान शिबिराला भेट दिली. दिवसभर विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराला उपस्थित राहून रक्तदान केले.
यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपविभागीय पोलीस अधिकार विक्रम कदम, मनसेचे शॅडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे, नगरसेवक महादेव धोत्रे, माजी नगरसेवक धनंजय कोताळकर, नागेश गंगेकर, एनआयटीचे संचालक श्याम गोगाव, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, रिपाइंचे संतोष पवार, गणेश बागल, दत्तात्रय बागल आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरे होणे काळाची गरज
मागील वर्षीपासून कोरोनासह विविध आजारांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या काळात अनेकवेळा राज्यभर रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणविला. रक्ताची आवश्यकता असताना रक्तदान करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. मात्र, ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन ही रक्तदानाची चळवळ पुन्हा जोमाने सुरू केली आहे. अशी रक्तदान शिबिरे काळाची गरज असून अनेकांना जीवदान मिळणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले म्हणाले.