सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ते घरकुल रस्त्यावर एका २५ ते २८ वर्षांच्या तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. ही घटना मंगळवार, दि. २९ मार्च २०२२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समोर आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंभारी ते घरकुल रस्त्यावरील एका हॉटेल परिसरात ३० ते ३५ फुटांची कोरडी विहीर आहे. या पाणी नसलेल्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती वळसंग पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे कर्मचारी दासरी, व्हनमोरे, राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली. तत्काळ खड्ड्यात पडलेल्या तरुणाला उपचारासाठी वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक अतुल भाेसले यांनी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉ. अभिजितसिंग राठोड यांनी पाेलिसांना सांगितले.
--------
अंगावर ऑपरेशनच्या खुना...
अनोळखी तरुणाचा मृतदेह कुंभारी परिसरात आढळून आला. पोलीस घटनास्थळी दाखल होताच बघ्याची मोठी गर्दी झाली होती. त्या तरुणाच्या अंगावर लक्झरी नाव असलेला चॉकलेटी रंगाचा टी-शर्ट आहे. जीन्स पॅन्ट घातलेली असून छातीवर ऑपरेशनच्या खुना असल्याचे पोलिसांनी सांगितले.
--------
अज्ञात तरुणाचा मृतदेह कुंभारी हद्दीत मिळाला आहे. याबाबत नोंद वळसंग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. लवकरच मृत्यूचे कारण व खरे सत्य बाहेर येईल. आता कोणताच अंदाज लावणे योग्य नाही.
- अतुल भोसले,
सहायक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस ठाणे