राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या ताब्यात गेल्यानंतर, निवडणूक आयोगाने नुकतेच शरद पवार गटाला नवे नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' असे नाव आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह मिळाले आहे. शरद पवार गटाने या चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावर केले. यासंदर्भात बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तुताऱ्या वाजवा, नाही तर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू असे दिसत असल्याचे म्हटले आहे. ते सोलापूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील? - यावेळी रायगडावर लोकसभेपूर्वी तुतारी वाजतेय... वाजेल का...?' असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू असं दिसायला लागलं आहे. मोदीजींची लोकप्रीयता जी वाढायला लागली आहे, एकाने फार छान विश्लेषण केले आहे की, मोदी जी हे जात पात भाषा धर्म याच्या वर गेले आणि एक लाभार्थी नावाचा गट त्यांनी निर्माण केला. तो म्हणतो, बाबानो तुमचं राजकारण राहुद्या बाजूला, आम्हाला मोदी हवे आहेत. याचे प्रत्यंतर अगदी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसलं, तीन राज्यांच्या निवडणुकीत दिसलं."
"शरद परावांनी असं म्हणायचंच असतं..."-"मध्यप्रदेशात एवढं मोठं एकतर्फी यश कधी मिळालंच नव्हतं भारतीय जनता पार्टीला. त्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे... शेवटी विरोधी पक्षाने शेवटपर्यंत हार मानायचीच नसते ना. सारखं म्हणायचंच असतं, शरद परावांनी असं म्हणायचंच असतं की, माझे 20-22 येणार आहेत. नशीब ते 20-22 तरी देतायत इकडे. पण त्यांना हे कळून चुकले आहे की 45 वैगेरे काही नाही, बहुतेक 48 पर्यंत गाडी जाईल," असा चिमटाही पाटील यांनी शरद पवारांना काढला.