अक्कलकोट : म्हैस धूत असताना पाय घसरून भीमा नदीच्या पाण्यात बुडालेल्या एका १७ वर्षीय मुलाचा मृतदेह तब्बल २२ तासांनी सापडला.
संदीप अशोक बिराजदार असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलाचे नाव असून, रविवारी दुपारी ही घटना घडली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, संदीप व त्याचा भाऊ शिवराज हे दोघे मिळून रविवारी दुपारी भीमा नदीत म्हैस धुण्यासाठी गेले होते. दरम्यान, संदीप हा पाय घसरून नदीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. शिवराजने पळत जाऊन वडील अशोक व गावातील लोकांना संदीप पाण्यात बुडाल्याचे सांगितले. लोकही धावत आले आणि शोधमोहीम सुरू झाली. मात्र तब्बल २२ तासांनी संदीपचा मृतदेह आढळून आला. अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत संदीपचे वडील अशोक बिराजदार यांनी दक्षिण पोलीस ठाण्यात खबर दिली.