सांगोला : हलदहिवडी येथे घरासमोर खेळत-खेळत गायब झालेल्या बालिकेचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर एका शेतात पाण्याच्या डबक्यात तरंगताना मिळून आला. या बालिकेचा अकस्मात मृत्यू की खून ? असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सत्य पुढे येणार आहे.
जान्हवी अमोल फाळके (वय १७ महिने) असे मृतावस्थेत आढळलेल्या बालिकेचे नाव असून, शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हलदहिवडी (ता. सांगोला) फाळकेवस्ती परिसरात ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
जान्हवी ही शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घरासमोर खेळत होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली. दरम्यान, तिचे वडील अमोल फाळके आणि नातेवाईकांनी तिचा दिवसभर सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अखेर अमोल फाळके सायंकाळी ५ च्या सुमारास मुलगी गायब झाल्याबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. दरम्यान हलदहिवडीचे पोलीस पाटील यांनी पोलीस हेड काॅन्स्टेबल बापूराव झोळ यांच्याशी संपर्क साधून फाळकेवस्ती पासून १ किलोमीटर अंतरावर शेतातील पाण्याच्या डबक्यात बालिकेचा मतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, पोलीस हेड काॅन्स्टेबल बापूराव झोळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. डबक्यातील पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच जान्हवीचा अकस्मात मृत्यू की खून ? हा खरा प्रकार उघडकीस येणार आहे.