सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीत एक तरूण वाहून गेला. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी नदीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले.
शौकत रशिद नदाफ (३७) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, हरणा नदीमध्ये मुस्ती येथील एक ग्रामस्थ पाण्यात वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला त्या निषेधार्थ नदीवर पूल बांधण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मुस्ती ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून अधिकाऱ्यांचा रस्ता अडवला होता. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत या सर्व आंदोलकांना उठवून प्रशासनाला निवेदन देण्यास भाग पाडले.
मुस्ती या गावापासून 100 मीटर अंतरावर हरणा नदी आहे. मुस्ती वरून अरळीकडे जाण्यासाठी मार्ग नाही, नदीतून जावे लागते. नदीवर ब्रिज नसल्याने नदीत बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शौकत नदाफ हे नदीत अचानक पाणी आल्याने वाहून गेले, मंगळवारी त्यांचा मृतदेह सापडला. केवळ नदीवर ब्रिज नसल्याने नदाफ यांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावचे नागरिक संतापले. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांचे रस्ता अडवला आणि घोषणाबाजी केली.