गौडवाडीचे पोलीस पाटील सोपान जनार्धन गडदे यांना १५ जुलै रोजी दुपारी फोनवर बुद्धेहाळ तलावात मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तेथे जाऊन खात्री केल्यानंतर सांगोला पोलिसांना कळविले. याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस नाईक विजयकुमार थिटे, राजकुमार चौगुले, पोलीस हवालदार आप्पासो पवार, पोलीस गणेश कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिले असता मृतास चटई आणि शेडनेटमध्ये गुंडाळून त्यावर दोरीने बांधलेले होते. प्रेताच्या गुंडाळलेल्या शेडनेटला एक मोठा दगडही बांधला होता. त्या मृतदेहास डोके नाही तर खांद्यापासून खालील शरीर पाण्यात भिजून पूर्णपणे कुजलेले होते. प्रेताचे दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून मागील बाजूस बांधलेले तर दोन्ही हात शरीरापासून वेगळे झालेले केवळ चमडे राहिलेले व छातीवरील बाजूस बांधलेले दिसले.
या प्रकरणी सोपान गडदे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.
----
घटनास्थळ दोन जिल्ह्याच्या सीमेवर
ज्या बुद्धेहाळ तलावात मृतदेह सापडला तो गौडवाडी, बुद्धेहाळ, सोमेवाडी (ता. सांगोला) व शेटफळे (ता. आटपाडी, जि. सांगली) या गावांसह दोन जिह्याच्या सीमेवर आहे. तलावाचे पाणलोट क्षेत्र व परिसर विस्तीर्ण आहे, त्यामुळे या खुनाचा उलगडा करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे.
------
सोशलमिडीयावर छायाचित्र शेअर
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. घटनास्थळाचा पंचानामा करण्यात आला. संबंधीत अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी त्याचे छायाचित्र व्हाटस्अप सह सोशलमिडीयावर शेअर करण्यात आले आहे. घटनास्थळ दोन्ही सीमेवर असल्याने नजीकच्या सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यासही छायाचित्र पाठवून मिसिंगची तक्रार आहे काय याचीही पडताळणी करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.
----