मूळचे आलेगाव व सध्या वाढेगाव येथील विनायक ऊर्फ समाधान विठ्ठल मोरे व आई धोंडूबाई विठ्ठल मोरे हे माय-लेक शुक्रवारी स. ९.३० च्या सुमारास माण नदीवरील वाढेगाव बंधाऱ्याच्या डोहात धुणे धुण्यासाठी गेले होते. यावेळी आई धुणे धूत असताना विनायक पोहत होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुुुुडाला.
आईने आरडाओरडा करत वस्तीवरच्या लोकांना मदतीसाठी बोलाविले. यावेळी भागवत लक्ष्मण कोळी, विवेक शिंदे, राजू कोळी, धनाजी दिघे व इतर तरुणांनी डोहाच्या पाण्यात त्याचा शोध सुरू केला. मात्र तो हाती लागला नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार किशोर बडवे, तलाठी अण्णासाहेब नटवे, सरपंच नंदू दिघे, पोलीस पाटील शुभांगी पवार, कोतवाल समाधान सूर्यगंध, हवालदार हजरत पठाण, नागेश निंबाळकर, धनंजय आवताडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बराच शोध घेऊनही तो सापडत नव्हता.
शोकाकूल आई धोंडूबाईसह नातेवाईक अश्रू ढाळीत डोहाच्या काठावर बसून विनायक लवकर सापडावा, यासाठी देवाकडे प्रार्थना करीत होते. दरम्यान, महसूल प्रशासनाने सोलापूर येथील आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांनीही पाणबुडीच्या मदतीने रात्री ८ ते १० या वेळेत पाण्यात शोध घेतला पण तो सापडला नाही. शनिवारी दुसऱ्या दिवशी २४ तासानंतर सकाळी ९.३० च्या सुमारास विनायक सापडला.
याबाबत औदुंबर दिघे (रा. वाढेगाव) यांनी पोलिसात खबर दिली असून अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे.
---
आईचा तुटला आधार
आलेगाव येथील धोंडूबाई हिचे पती विठ्ठल मोरे यांनी दुसरा विवाह केल्याने मुलगा विनायकसह धोंडूबाई वाढेगाव येथे नातेवाईक समवेत राहत होत्या. दरम्यान, विनायकचा डोळ्यासमोर पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे धोंडूबाईच्या जगण्याचा आधार तुटला. त्या एकट्या पडल्याची चर्चा सुरू होती.
-----