मोहोळ : दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देताना आष्टे बंधाऱ्यातून वाहून गेलेल्या सौरभ बेंबळघेचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी हाती लागला. मृतदेह मिळाल्याचे ऐकून अंध आई-वडील आणि पत्नीने एकच हंबरडा फोडला.
रेल्वे रुळासाठी लागणाऱ्या सिमेंटचे स्लीपर करण्याचा कारखाना कोळेगाव येथे आहे. या कारखान्यातील कामगारांनी गणेशोत्सवानिमित्त गणरायाची प्रतिष्ठापना केली होती.
दीड दिवसाचा गणपती विसर्जन करण्यासाठी सौरभ सुभाष बेंबळघे (वय १८, रा. साकोळ, ता. शिरूर, अनंतपाळ, ता. लातूर) हा सात ते आठ कामगारांसमवेत ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान आष्टे बंधाऱ्यावर गेला होता. गणपतीचा जयघोष करीत आनंदात सौरभ पाण्यात उतरला. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने बघता-बघता तो गायब झाला. पाण्यात वाहून गेलेल्या सौरभचा शोध ११ सप्टेंबरच्या दुपारपासून मोहोळ पोलीस ठाण्याचे साहाय्यक फौजदार युसुफ शेख, होमगार्ड दत्तात्रय मोटे यांच्या पथकाने सुरू केला. गेले दोन दिवस नदीपात्र परिसरात ते तळ ठोकून होते. शनिवार व रविवार या दोन दिवसांत कोळेगाव येथील मच्छीमारांच्या मदतीने आष्टे बंधारा ते लांबोटी दरम्यान सौरभचा शोध घेतला. लक्ष्मण मल्लाव, दत्ता भोई, बालाजी भोई, ज्ञानेश्वर भोई, तुकाराम भोई, दीपक भोई, दत्तात्रय मल्लाव, सोमनाथ वाघमोडे या कोळेगावच्या आठ मच्छीमारांनी सीना नदीपात्रात आष्टे बंधाऱ्यापासून लांबोटी गावापर्यंत जवळपास सहा किलोमीटरचे नदीतले अंतर कापून शोध घेतला. रविवारी सकाळपासून थर्माकॉल, पाण्यातल्या ट्यूबच्या साहाय्याने शोध घेत राहिले.
अखेर सोमवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोळेगाव परिसरात नदीपात्रात कोंडीबा वाघमोडे या शेतकऱ्याच्या शेताजवळ एका झाडाला त्याचा मृतदेह अडकलेला आढळून आला. मोहोळ पोलिसांनी कोळेगाव येथील मच्छीमारांच्या साहाय्याने मोठा दोरखंड बांधून त्याचा मृतदेह बाहेर काढला.
याबाबत सौरभचे चुलते बेंबळघे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात पाण्यात बुडून अकस्मात मृत्यू झाल्याची खबर दिली. अधिक तपास साहाय्यक फौजदार युसुफ शेख हे करीत आहेत.
----
मृतदेह नेण्यासाठी सहकाऱ्यांनी दिली ॲम्ब्युलन्स
लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यात राहणाऱ्या सौरभचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांनी त्याच्या गावी नेण्याची इच्छा व्यक्त केली. फॅक्टरीच्या माध्यमातून सौरभचा मृतदेह साकोळ गावी पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याला आणि नातेवाइकांना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स आली.
---
अंध मात्या-पित्याचा आधारवड हरपला
१२ वी पर्यंतचे शिक्षण घेऊन अंध मातापित्याच्या आधाराची काठी ठरावी म्हणून त्याने काम शोधले. मोहोळ तालुक्यात आष्टे बंधाऱ्याजवळ रेल्वेचे स्लीपर बनवणाऱ्या कंपनीत त्याला पर्यवेक्षक म्हणून काम मिळाले. भावी आयुष्याची स्वप्ने पाहणारा सौरभचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला. त्याच्या मृत्यूने अंध मातापित्याच्या आयुष्यात कायमचा अंधार पसरला आहे.
---
फोटो :
१३ सौरभ
१३सौरभ १
सिना नदीपात्रात सापडलेला मृतदेह बाहेर काढताना.