अरुण बारसकर -सोलापूर : बनावट विमामाफियांच्या दबावामुळे तपासणीत येणारे अडथळे पार करीत कृषी खाते धाडसाने फळपीकांची तपासणी करीत आहे. राज्यात आतापर्यंत फळबागा नसताना विमा भरलेली ३४०४ बनावट प्रकरणे आढळून आली आहेत. सर्वाधिक विमा भरलेल्या जालना व जळगाव जिल्ह्यात तपासणीला मोठे अडथळे निर्माण केले जात असल्याचे सांगण्यात आले.
अंबिया बहार फळपीकांचा बनावट शेतकऱ्यांकडून भाडेकरार जमीन दाखवून तसेच फळपीक नसताना विमा उतरल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. याची वृत्तमालिका लोकमतने प्रसिद्ध केली होती. कृषी खात्याकडून याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारला पञ दिले होते. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी या प्रकरणाची संपूर्ण तपासणीचे आदेश दिले असतानाच केंद्रीय कृषी सचिवांनीही राज्याला तपासणीचे पञ दिले होते. राज्यभरात सुरु असलेल्या तपासणीत आतापर्यंत ३४०४ बनावट प्रकरणे उघडकीस आली आहेत. बनावट पीक विम्याचे लोण राज्यातील २४ जिल्हात असल्याचे आतापर्यंत आढळले असून तपासणी अद्याप सुरूच असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी राज्यात २ लाख ४८ हजार ९२३ शेतकऱ्यांकडून फळपीक विमा भरला आहे. यामध्ये जमिनीच्या मूळ मालकांऐवजी इतरांनीच भाडे तत्त्वावर जमिनी दाखवुन फळबागा नसताना पीक विमा भरणा केला आहे. संपूर्ण फळबागांची कृषी सहाय्यक, तलाठी व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. माञ बनावट रॅकेटच्या दबावामुळे अनेक जिल्हात तपासणीला अडथळे आणले जात आहेत. प्रामुख्याने जालना व जळगाव जिल्हात तपासणीला अडथळे आणले जात आहेत. आतापर्यंत राज्यात अवघ्या ५२ हजार हेक्टरची तपासणी झाली आहे.
विमा कंपनीचेही लोक सहभागी?२०२१-२२ या वर्षीची असे प्रकार झाले माञ सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर पैसे मिळालेत. या वर्षी फळपीक विमा क्षेञ दीडपट झाले आहे. विमा कंपनीच्या काही लोकांना याची कल्पना होती माञ त्यांनी गप्प राहण्याचे काम केले. त्याला कृषी खात्याकडूनही बळ मिळाल्याचे सांगण्यात आले.