सोलापूर : शहरातील बोगस लेआउट प्रकरणात महापालिकेच्या नगररचना कार्यालयातील आवेक्षक राजकुमार मेश्राम यांचा शोध घेण्यात येत आहे. मेश्राम जुळे सोलापुरातील एका सोसायटीत राहायला होते; पण त्यांच्या घराला कुलूप आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत या सोसायटीमधील अनेक सदस्यांशी चर्चा करून मेश्राम यांचा माग काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
सोरेगाव आणि दहिटणे येथे बोगस लेआउटची प्रकरणे उघडकीस आली आहेत. शहरात अशी अनेक प्रकरणे असल्याचे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बांधकाम व्यवसायात गैरप्रकार करणाऱ्या लोकांनी मनपाचे आवेक्षक राजकुमार मेश्राम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसे जबाब त्यांनी पोलिसांना दिले आहेत. यावर मेश्राम यांच्याकडून खुलासा आलेला नाही. मेश्राम बऱ्याच दिवसांपासून गायब आहेत. मेश्राम जुळे सोलापुरात ‘आयएमएस’ स्कूल परिसरातील एका सोसायटीमध्ये राहतात; पण घराला कुलूप आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांशी चर्चा केली. मेश्राम कुठे असतील, अलीकडच्या दिवसांत कोणाशी बोलणे झाले होते का, याबद्दलची माहिती जाणून घेतल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.
सलगरवस्ती येथील प्रकरणाकडे लक्ष
सलगरवस्ती येथील बोगस लेआउट प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बोगस नकाशाच्या आधारे खरेदी-विक्री करण्यात आली आहे. हे नकाशे कोणाकडून प्राप्त झाले याचा शोध घेतला जात असल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांना आवश्यक असलेली कागदपत्रेही नगररचना कार्यालयाकडून तत्काळ उपलब्ध करून दिली आहेत. या प्रकरणात केव्हा गुन्हा दाखल होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.