राजकुमार सारोळे सोलापूर : सोलापूर महापालिकेतील भाजपच्या सत्तेचा आज दुसरा वर्धापनदिन झाला. या दोन वर्षाचा लेखाजोखा मांडत असताना बहुसंख्य नगरसेवकांनी ‘हाती काहीच नाही, कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेष म्हणजे भाजपच्याच एका नगरसेवकाने जनतेची कामे झाली नसल्यामुळे नाराजी व्यक्त करून स्वपक्षाला घरचा आहेर दिला. महापालिकेतील दोन देशमुखांची गटबाजीही वेळोवेळी उघड झाली असून, यामुळे विकासाला खीळ बसत असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली.
सत्ताधारी भाजपचेच सदस्य राजेश काळे यांनी निवडून येऊन दोन वर्षे झाली, पण या काळात लोकांची अपेक्षा पूर्ण करू न शकल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. आतापर्यंत ठोस अशी कामे केली नाहीत.
लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे त्यांनी नमूद करून भाजपच्या पदाधिकाºयांना घरचा आहेर दिला आहे. काम करताना प्रशासनातील तत्पर व जनतेच्या कामांबाबत देणे-घेणे नसणारे कर्मचारी भेटल्याचे काळे यांनी म्हटले आहे. वारंवार तहकूब होणाºया सभा, चर्चेविना मंजूर होणारे विषय यामुळे आमच्या हाती भोपळा मिळाल्याचे नमूद केले आहे.
टोकाच्या भूमिकेचे प्रात्यक्षिक अनुभवाला मिळाले, आता तरी पदाधिकारी गांभीर्याने वागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.राजेश काळे यांच्या घरच्या आहेरानंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दोन वर्षांचा लेखाजोखा मांडताना बोचरी टीका केली व विकासासाठी एकत्र येण्याबाबत सकारात्मकता दाखविली. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी दोन वर्षांत भाजपच्या पदाधिकाºयांना निधी मिळाला, पण १०२ नगरसेवक बेहाल झाले. स्थायी सभापती, झोन सभापती नाही. दररोज पाणी देतो म्हणाले, त्याचे काय झाले समजत नाही. १५० विषय प्रलंबित आहेत.
गटबाजीत दोन वर्षे गेली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. नगरसेवक विनोद भोसले म्हणाले, दोन वर्षांत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, याचे दु:ख आहे. सत्तेवर आलेल्या भाजपकडून निधी मिळाला नाही. गटबाजी व ढिसाळ कारभार पाहावयास मिळाला. शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मोठी स्वप्ने पाहून निवडून आलो, पण अपेक्षापूर्ती झाली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. सभागृहात अनेक विषय मांडले, पण संबंधित कर्मचाºयांवर कारवाई झाली नाही, असे ते म्हणाले. बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दहा वर्षांत असा कारभार पाहिला नाही, असे म्हटले आहे. दोन वर्षांत कामेच झाली नसल्याने नगरसेवकांना महापालिकेत येण्याची इच्छा होत नाही, असे म्हटले आहे. निधीअभावी प्रभागातील विकासकामे न झाल्याने नागरिक नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता रोटे यांनी व्यक्त केली.