सध्या सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळतेय लोक ऐकत नाहीत. नियम मोडतात फार अवघड आहे. पण लोक म्हणजे आपणही त्यात आहोत हे विसरतात. हेही दिवस जातील. सुखामागून दु:ख आणि दु:खामागून सुख हे नियतीचे चक्र प्रत्येकाला जीवनात येत असते. सुखाचा काळ कितीही मोठा असलातरी तो अल्प वाटतो आणि दु:खाचा काळ कितीही अल्प असला तरी तो फार मोठा भासतो.
गरिबांना तांदूळ, गहू, ज्वारी, साबण फुकट मिळणार म्हणून रात्री दोनपासून रांगेत उभे राहतात. भाजी मंडई, पाण्याचा टँकर, बँक, इत्यादी ठिकाणी डिस्टन्सचा फज्जा उडवला जातो. जणूकाही आपल्या बहुमोल जीवापेक्षा भाजी, सामान महत्त्वाचे. मद्यपी लोक मद्याविना इतकी तडफड करतात की सॅनिटायझरचा वापर करून दारू निर्माण करताहेत. जीवाची पर्वा न करता काम करणारे कोरोना फायटर्स-डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस खाते यांच्या वाहनांची मोडतोड व जाळपोळ करतात. आजही निष्कारण फिरणारे, मॉर्निंग वॉकला जाणारे, मास्क न लावणारे लोक यांना उठाबशा, बेडूक उड्या, योगासन इत्यादी शिक्षा होऊनही पोलिसांच्या डोक्याला ताप देताहेत.
काही कामगार उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालत घर गाठण्याचा प्रयत्न करतात. शेतकºयांच्या मालाला भाव पडून मिळाल्याने ते हताश झालेत. बारा बलुतेदारासमोर उदरनिर्वाहाचे भयानक संकट उभे राहिले आहे. साखरपुडा, लग्न, मुंज इत्यादी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर बंदी असल्याने बँड, घोडा, कार्यालय, आचारी, फोटोग्राफर यावर उदरनिर्वाह व कर्ज फेडणे मुश्किल झाले आहे. कित्येकांना आई, वडील, स्वजनांच्या अंत्यविधीलाही जाता आले नाही. व्हॉट्सअॅपवरून दर्शन घ्यावे लागले. पत्नीवर पतीला मुखाग्नी देण्याची वेळ आली आहे.
नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे काही चांगलेही उपक्रम राबवले जातात. गुरुमंत्र कार्यक्रमांतर्गत शाळा, कॉलेज बंद म्हणून शिक्षक, प्राध्यापक रोज किमान दहा विद्यार्थ्यांना आॅनलाईन अभ्यासाबाबत मार्गदर्शन तर करतात पण आरोग्याची काळजी कशी घ्यायची हेही सांगतात. डॉक्टरही पंधरा ते वीस जणांना फोनवरून मोफत सल्ला व मार्गदर्शन करतात. जैन संघटनेतर्फे फिरता दवाखाना- घरोघरी जाऊन डॉक्टर तपासणी करतात. नागपूरच्या निवारा केंद्रात परप्रांतीयांना योगासन व्यायाम प्रकार शिकवले जातात. वाशिममधील दांपत्याने एकवीस दिवसात पंचवीस फूट खोल विहीर खोदली. काहीजण गाण्यातून तर काही रस्त्यावर रंगवून कोरोनामुक्तीचा संदेश देतात. पोलीस, डॉक्टर वयोवृद्ध, बाधितांना हाताने खाऊ घालतात. काही ठिकाणी पोलिसांच्या रुटमार्चवर फुलांचा वर्षाव करतात. त्यांना औक्षण करून कामाचे कौतुक केले जाते.
अमेरिकासारख्या अत्यंत प्रगत, सधन, श्रीमंत देशात लाखो लोक मृत्युमुखी पडूनही प्रशासन सांगते की काम केले तर पगार. फुकट पगार देणे परवडत नाही. पण आपल्या देशात जात, धर्म, पंथ भेदभाव विसरून सर्वतोपरी प्रचंड मदत- धनधान्य, जेवण, पैसे, औषधे, सेवा, इत्यादीतून माणुसकीचे दर्शन घडते. लहान मुले खाऊचे, वाढदिवसाचे पैसे मदत म्हणून देतात. प्रशासन पैसा, काम यापेक्षा मानवी जीवाच्या संरक्षणाला महत्त्व देते. नुसती दानत असून चालत नाही. नियतही खूप महत्त्वाची आहे. हे भारतीय लोकांनी, प्रशासनाने कृतीतून दाखवून दिले. यात पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रशासनाचा सिंहाचा वाटा आहे. कधी नव्हे ते घरातील सर्व लोक रात्रंदिवस एकत्र आहेत. एकोप्याने विचारविनिमय, गप्पागोष्टी करतात. बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. पुरुषमंडळी थोडेथोडे स्वयंपाक, घरस्वच्छता करून गृहिणींना कामात हातभार लावतात. घराचे, गृहिणीचे मोल सगळ्यांना कळते आहे. प्रशासनाच्या नियमानुसार आपण स्वयंशिस्त आणि नियोजनबद्ध काम केले तर निश्चितच कोरोनाच्या महामारीवर यशस्वी मात करून जीवन सुसह्य होईल. कोरोनाच्या महाभयंकर, क्रूर शापाचे वरदानात कसे रूपांतर करायचे. लॉकडाऊनचे कुलूप कसे आणि केव्हा उघडायचे याची चावी फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. - शालिनी शेटे(लेखिका सेवानिवृत्त प्राध्यापिका आहेत)