- राकेश कदम
सोलापूर - हाेटगी राेड विमानतळावरुन विमानसेवा सुरू हाेत असेल तर हरकत नाही. मात्र, भविष्याच्या दृष्टीने बाेरामणी विमानतळ विकसित करणे हाच उत्तम मार्ग असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी साेलापूर विकास मंचच्या सदस्यांसमाेर मांडले.
साेलापुरातून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी साेलापूर विकास मंचचे सदस्य पाठपुरावा करीत आहेत. या सदस्यांनी साेमवारी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. केंद्र सरकारच्या उडान याेजनेत साेलापूरचा समावेश आहे. मात्र, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याने हाेटगी राेड विमानतळावरून विमानसेवा सुरू हाेण्यात अडथळे आहेत. सोलापूरकरांना नागरी विमानसेवा उपलब्ध होऊ न शकल्याने लाखो तरुणांना नोकरी आणि व्यवसायानिमित्त कायमस्वरूपी सोलापूर सोडून जावे लागले.
साेलापूर विकास मंचचे सदस्य गेली एक वर्षे केंद्रीय विमानमंत्री, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी निवेदने देत आहेत. आपणही या मागणीला पाठिंबा द्यावा असा आग्रह विकास मंचचे सदस्य केतन शहा व इतरांनी धरला. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रकल्प सुरू होऊन कार्यान्वित होण्यासाठी काही अवधी निश्चित लागणार आहे.
बाेरामणी विमानतळ सुरू व्हावे यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे सदस्यांनी सांगितले. यावेळी मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय जाधव, प्रमोद शहा, आनंद पाटील, दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, शशिकांत क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, सुहास भोसले, आदी उपस्थित होते.
हाेटगी राेड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हायला हरकत नाही. या विमानतळाची धावपट्टी वाढविणे, नाईट लॅंडिंगची सुविधा यासह विविध कामांसाठी मीच निधी मिळवून दिला हाेता; पण माेठी विमाने उतरायची असतील तर बाेरामणी विमानतळ विकसित करणे हाच पर्याय आहे. - सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री.