सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सगळीकडे संचारबंदी लावण्यात आली आहे. याच अनुषंगाने शहरात येणाऱ्या 8 नाक्यांवर बॉर्डर सिलिंग पॉईंट करण्यात येत आहे. तसेच दूधवाले, भाजी विक्रेते, खत विक्रेते आणि बॅंकांना वेळ ठरवून देण्यात आली आहे.
बॉर्डर सिलिंग पॉईंटवरून फक्त पास असणारे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, शहरात विविध शासकीय कार्यालयात काम करणारे अधिकृत पासधारक अधिकारी-कर्मचारी, गंभीर स्वरूपाचे पेशंट घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका, यात रुग्ण, एक केअर टेकर आणि चालक यांनाच प्रवेश असणार आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणे - नवीन पुना नाका, नवीन बार्शी नाका, जोडभावी पेठ पोलीस ठाणे - नवीन तुळजापूर नाका, एमआयडीसी पोलीस ठाणे, नवीन हैदराबाद नाका, जेलरोड पोलीस ठाणे - नवीन अक्कलकोट नाका, विजापूर नाका पोलीस ठाणे - नवीन होटगी नाका, नवीन विजापूर नाका, सलगर वस्ती पोलिस ठाणे - नवीन देगाव नाका याठिकाणी बॉर्डर सीलिंग पॉइंट लावण्यात आले आहेत.
भाजी विक्रेत्यांना सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत, घरपोच देणाऱ्यांना सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत, किराणा दूकान सकाळी 6 ते दुपारी 2, दूध विक्रेत्यांना सकाळी दहापर्यंत, खत विक्रेत्यांना दुपारी 2 पर्यंत, बॅंकांना सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांशिवाय कोणीही घराबाहेर यायचे नाही. ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच बॉर्डर सिलिंग पॉईंटवरून शहरात प्रवेश दिला जाईल. भाजी विक्रेते, दूध विक्रेते, खत विक्रेते आणि बॅंकांना वेळ ठरवून दिली आहे. सर्वांनी कायद्याचे पालन करावे. - अंकुश शिंदेपोलिस आयुक्त, सोलापूर शहर