सोलापूर : लॉकडाऊन काळात हरिद्वार येथे अडकलेल्या सोलापुरातील ७० भाविकांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. सर्व ७० भाविक सध्या हरिद्वार येथील दुधाधारी चौकातील बाबा मोहनदास आश्रमात अडकून आहेत.
लॉकडाऊनमुळे मागील चाळीस दिवसांपासून त्यांचे हाल सुरू असल्याने ते सोलापूरला येण्यासाठी धडपडत आहेत. सोलापूरला जाण्यासाठी हरिद्वार प्रशासनाकडून परवानगी देण्यात यावी, या मागणीकरिता सर्व भक्तगण हरिद्वार -देहरादून हायवेवर ठिय्या आंदोलन केले. सोलापूरकरांनी केलेल्या या आंदोलनामुळे हरिद्वार प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सर्व भक्तगणांना सोलापूरला पाठवण्यासाठी हरिद्वार प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती भक्त प्रमुख हरिदास कोटा यांनी ‘लोकमत’ला दिली.
सर्व भक्तगण जुना विडी घरकूल तसेच एमआयडीसी एरिया परिसरातील आहेत. मंगळवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी सर्व भक्तगणांनी हायवेवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बिनधास्तपणे हायवेवर ठिय्या आंदोलन देखील केले. याची दखल तेथील प्रसारमाध्यमांनी घेतली. त्यामुळे तेथील प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवार दिनांक २९ एप्रिल सकाळी हरिद्वार येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बाबा मोहनदास आश्रमला भेट देऊन सर्व भक्तगणांची चौकशी केली. मागील ४० दिवसांपासून आम्ही येथे अडकून आहोत. आमचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सोलापूरला जाण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी सर्व भक्तांनी केली.
त्यानंतर प्रशासनातील अधिकाºयांनी भक्तांच्या प्रमुखांना जिल्हाधिकाºयांसमोर घेऊन गेले. जिल्हाधिकाºयांनी रितसर तसे अर्ज करायलाही भक्तांना सांगितले. आश्रमातील सर्व सोलापूरकर भक्तांची ओळख परेड झाली. सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी देखील करण्यात आली. स्वखर्चातून सोलापूरला जाण्याची आमची तयारी असून त्याकरिता बसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात यावी आणि तशी परवानगी देखील प्रशासनाकडून देण्यात यावी, असे अर्ज भक्तांनी हरिद्वार जिल्हाधिकारी रविशंकर यांच्याकडे केले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी केला फोन- लॉकडाऊन काळात हायवेवर ठिय्या आंदोलन केल्याची माहिती प्रसारमाध्यमातून समोर आली. त्यामुळे तेथील पोलीस प्रशासन खवळले. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी या आंदोलनाविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर सर्व सोलापूरकर भक्तांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून सुरू झाली. या पार्श्वभूमीवर तेथील भक्तांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना फोन करून या बाबतची माहिती दिली. सर्व भक्तगण घाबरलेले असून प्रचंड हाल होत आहेत, कृपया आम्हाला सोलापूरला येण्याकरिता सुशीलकुमार शिंदे यांनी मदत करावी, अशी विनंती भक्तांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली. या फोनची दखल घेत सुशीलकुमार शिंदे यांनी थेट हरिद्वारच्या जिल्हाधिकाºयांना फोन लावला. सर्व भक्तगण धास्तावलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करु नका तसेच त्यांना सोलापूरला पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती शिंदे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. शिंदे यांच्या विनंतीला मान देत प्रशासनाने कारवाई करण्याचे टाळले. सोलापूरला येण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती हरिदास कोटा यांनी ‘लोकमत’ला दिली.