मंगळवेढा : एका कोरोनाबाधिताने सिद्धापुरात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर मंगळवेढ्यानगर पालिका शाळेच्या परिसरातील विहिरीत उडी घेऊन एका वृद्धेने आत्महत्या केल्याची घटना घडली.
सिध्दापूरमध्ये आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव चंद्रकांत मारुती कोळी (वय ४५, रा. सिध्दापूर, ता. मंगळवेढा) असे असून १ मे रोजी सकाळी १० वाजता सिद्धापूर हद्दीत तांडोरे येथे त्याने आत्महत्या केली.
याबाबत चंद्रकांत यांचा मुलगा गंगाधर यांनी मंगळवेढा पोलिसांत खबर दिली असून अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, चंद्रकांत कोळी हे १ मे रात्री १२ वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडले. सकाळी दहा वाजेच्या सुमारास तांडोरे हद्दीत भगवान महाराज यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्याची कोरोना चाचणी केली. या चाचणीत तो कोरोनाबाधित आढळून आला. पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून अधिक तपास पोलीस नाईक शशिकांत चव्हाण करीत आहेत.
-------------
कोरोनामुळे तणावाखाली येऊन आत्महत्या
मंगळवेढा : कोरोनाची लागण झाल्याचे समजताच तणावाखाली येत एका वृद्धेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.सोमवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान मंगळवेढा नगरपालिका शाळा नं. २ च्या पाठीमागे गणेश विहिरीत वृद्धाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
शालन विठ्ठल सूर्यवंशी (रा.गुंगेगल्ली ,मंगळवेढा) असे मृत वृद्धेचे नाव आहे. याबाबत सतीश दऱ्याप्पा दत्तू (रा.गुंगेगल्ली) यांनी खबर दिली आहे. मृत शालन सूर्यवंशी हिला कोरोना झाल्याचे समजले. त्यानंतर ती मानसिक तणावाखाली येऊन घरात कोणास काही न सांगता सोमवारी सकाळी घराबाहेर पडली. सकाळी नऊच्या पूर्वी मंगळवेढा नगरपालिका शाळा नंबर-२ च्या पाठीमागील गणेश विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.