'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.'
By appasaheb.patil | Published: April 16, 2019 04:00 PM2019-04-16T16:00:04+5:302019-04-16T16:35:33+5:30
नितीन गडकरी यांनी सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित भाजप संकल्प मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर जोरदार टिका केली
सोलापूर : 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.' अशा शब्दात नितीन गडकरी यांनी सुशीलकुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर खोचक टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी आज सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित भाजप संकल्प मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ़ प्रशांत परिचारक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवाजीराव सावंत, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी आमदार नरसिंग मेंगजी, इंदिरा कुडक्याल, प्रविण डोंगरे, प्रा़ मोहिनी पत्की, शिवशरण आण्णा पाटील, माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदी शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेमध्ये त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'म्हातार वयात लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे कशाला उभे राहिले माहिती नाही' अशा शब्दात नितीन गडकरींनी शिंदेंवर घणाघात केला. याचवेळी मोदी सरकारने चार वर्षात केलेल्या कामगिरीवर भाष्य केले. देशात मुंबई ते दिल्ली या मार्गावर १२ लेनचा रस्ता बांधण्यात येणार आहे. हा जगातील मोठा रस्ता असणार आहे. याशिवाय देशात पुढील काळात १५ एक्सप्रेस हायवे बांधण्यात येणार असल्याचीही माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही घणाघात केला. 'मुसलमान, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूरांची गरिबी हटली का? काँग्रेस पक्षाने गरिबी हटवली, ती कार्यकर्ते, नेते, चेले चपाट्यांची गरिबी हटवली.' असंही नितीन गडकरी म्हणाले.
राजकारण हा आमचा धंदा नाही. राष्ट्रनिमार्णाचे प्रभावी उपकरण आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था 'दिल के टुकडे हुए हजार एक यहा गिरा, एक वहा गिरा.' अशी झाली आहे. ७० वषार्चा इतिहास हा बेईमानी आणि गद्दारीचा इतिहास आहे." अशी टीकाही नितीन गडकरी यांनी केली आहे.