तानाजी नामदेव कोळेकर असे अपहरण झालेल्या पित्याचे नाव आहे.
याबाबत पत्नी सुरेखा तानाजी कोळेकर यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी कैलास संभाजी जरे, संभाजी पांडुरंग जरे (रा. कौठाळी, ता. आटपाडी) या पितापुत्रासह दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
जुनी लोटेवाडी येथील तानाजी नामदेव कोळेकर यांचा मुलगा संतोष हा बिदर (कर्नाटक) येथे प्रकाश जरे यांच्या सोने-चांदीच्या दुकानात कामास आहे. दरम्यान ३१ मार्च रोजी सुरेखा कोळेकर व तानाजी कोळेकर पती-पत्नी जेवण उरकून रात्री १० च्या सुमारास घरात झोपले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास चारचाकी गाडीतून आलेल्या दोघांनी तानाजी कोळेकर यास आवाज दिला. पती-पत्नी घरातून बाहेर आले. त्यावेळी त्या चारचाकी गाडीतून कैलास संभाजी जरे व संभाजी पांडुरंग जरे खाली उतरून तानाजी यास तुझा मुलगा संतोष याने सोने चोरले आहे, तू आमच्याबरोबर गाडीत बस असे म्हणू लागले. यावेळी तानाजीने जरा थांबा संतोषला फोन करून विचारतो असे म्हणत असताना त्या चारचाकी गाडीतून आणखी दोघे अनोळखी इसम उतरले. यावेळी जरे पिता-पुत्रांसह त्या अनोळखी दोघांनी तानाजी यास हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गाडीत बसवले. त्यावेळी पत्नी सुरेखा हिने गाडी अडवून पतीला कोठे घेऊन चालला, अशी विचारणा केली. यावेळी तिलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान जरे पिता-पुत्रांनी सुरेखा हिचा दीर शिवाजी कोळकर यांनाही ते घेऊन गेले होते. त्यानंतर २ एप्रिल रोजी दीराला सोडून दिले. त्याने भावजय सुरेखाला जरे पिता-पुत्रांनी सोने द्या नाहीतर तुमची जमीन लिहून द्या. त्याशिवाय तानाजी व संतोष या दोघांना सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे सांगितले.