पोथरेत सीनेत वाहून गेला
लोकमत न्यूज नेटवर्क
करमाळा : आईबरोबर जनावरांना पाणी पाजण्यासाठी सीनानदीवर गेलेला दहा वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना करमाळा तालुक्यात पोथरे येथे घडली. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही. सीनथडी भागात दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.
पोथरे (ता. करमाळा) येथील आत्माराम काशिनाथ झिंजाडे यांची मुलगी ललिता अनिल शेळके ही तिच्या माहेरी आली होती. तिच्या सोबत तिचा ओम नावाचा दहा वर्षांचा मुलगा होता. सध्या सीना नदीला पाणी असल्याने ते जनावरांना पाणी पाजण्यासाठी दुपारी साडेतीन वाजता गेले. ओमने एक वासरू हाताला तिढा बांधून धरले होते. पाणी पिताना वासरू पाण्यात घसरून पडले. त्याबरोबर हाताला दाव्याचा तिढा असल्याने ओम ही पाण्यात पडला. वासरू पोहून पलीकडच्या कडेला निघाले पण ओम पाण्याच्या डोहात बुडाला. त्याची आई ललिता हिने पाण्यात उडी मारून शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. त्यानंतर तिने नातेवाईकांना बोलावले. शोधमोहीम सुरू झाली.
घटनास्थळी सरपंच धनंजय झिंजाडे, सदस्य संतोष ठोंबरे, शांतीलाल झिंजाडे, किसन झिंजाडे, पोलीस पाटील संदीप पाटील, मंडल अधिकारी राजेंद्र राऊत, गाव कामगार तलाठी मयूर क्षीरसागर, सहकारी रवींद्र जाधव व सोमनाथ खराडे यांनी भेट दिली. तहसीलदार समीर माने यांनी उशिरा भेट दिली.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत बोरगाव येथील पोहणारे मिटू भोई, शामराव भोई व तानाजी भोई प्रयत्न यांनी शोध घेतला.
----------
१३ ओम शेळके