सोलापूर : गेल्या दोन महिन्यांचे थकीत वेतन चार-पाच दिवसांत न दिल्यास लोकसभा निवडणुकीतील मतदान यंत्राची वाहतूक करणार नाही. बस वाहतूक ठप्प करु, असा इशारा महापालिका परिवहन उपक्रमातील कामगार कृती समितीने दिला आहे.
मनपा परिवहन उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पगार न मिळाल्याने परिवहन कर्मचाºयांनी २१ जानेवारीपासून संप पुकारला होता. विशेष म्हणजे या संपाला परिवहन समितीचे तत्कालीन सभापती तुकाराम मस्के यांच्यासह समितीने पाठिंबा दिला होता. मनपा प्रशासनाने अॅडव्हान्स देण्यास नकार दिला. त्यामुळे हा संप चिघळण्याच्या मार्गावर होता. अखेर महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर संप मागे घेण्यात आला.
संप मागे घेताना कर्मचाºयांचा नोव्हेंबरचा पगार रोखीने करण्यात आला तर डिसेंबरचा पगार आठ दिवसांनी थेट खात्यावर जमा करण्यात आला. पुढील पगार करण्यात अडचण येणार नाही, असे परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी सांगितले होते. पण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही परिवहन कर्मचाºयांचा पगार झालेला नाही. यासंदर्भात त्यांनी परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र मल्लाव वेळकाढूपणा करीत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
कुठे आहेत मल्लाव ? कामगारांचा सवाल - कर्मचारी कृती समितीचे प्रमुख देविदास गायकवाड म्हणाले, आमच्या अडचणीबाबत आम्ही परिवहन व्यवस्थापकांकडे जातो, पण ते आम्हाला भेटण्यास तयार नसतात. आता आमच्या पगाराची अडचण झाली आहे. पण ते कुठे आहेत? असा सवाल कामगार करीत आहेत़ चार-पाच दिवसांत पगार न झाल्यास आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रे वाहतुकीचे काम करणार नाही. राजकीय नेते असंवेदनशील असल्यामुळेच आमच्यावर ही वेळ आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
महिला व बालकल्याणकडील बिलापोटी ६९ लाख रुपयांचा अॅडव्हान्स मिळावा. मनपा अंदाजपत्रकात परिवहनसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे पैसेही द्यावेत़ यासाठी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची नुकतीच भेट घेतली. आयुक्तांनी दोन दिवसांत निर्णय देऊ, असे सांगितले होते. पण अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. उद्या कामगारांनी संप पुकारला तर आम्ही कामगारांसोबतच राहू. महापालिका आयुक्तांनी परिवहनचे बिल दिलेच पाहिजे. - गणेश जाधव सभापती, परिवहन समिती.