सोलापूर : मंदिरात देवापुढे एकदा संकल्प सोडतो... तो तडीस जातो... ही तर देवाचीच कृपा, असे म्हणत स्वत:ला धन्यधन्य समजणारे भक्तगण आता आपल्या भावनांना लिखित प्रतिक्रियेच्या माध्यमातून वाट करून देणार आहेत. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ग्रंथालय विभागातर्फे मंदिरात ठिकठिकाणी प्रतिक्रिया नोंदवह्या ठेवण्यात येणार आहेत. नववर्षानिमित्त मंदिराचे ब्रँडिंग करण्याचे हे पहिले पाऊल असल्याचे पंच कमिटीचे सदस्य सोमशंकर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रचार अन् प्रसाराचा विषय ‘लोकमत’ने दोन-तीन वर्षांपूर्वीच मांडला होता. तोच धागा पकडून सोलापुरात येणाºया सिनेअभिनेते, नाट्य कलावंत, संगीत, नृत्य, गायन क्षेत्रांमधील टॉपमोस्ट कलाकार, दिग्गज राजकारणी, देश-विदेशातील नामवंत मंडळींना खास आमंत्रण देऊन त्यांना श्री सिद्धरामेश्वर मंदिरात आणण्याची जबाबदारी स्वीकारत पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी सोलापूरचे, जेणेकरून श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचे ब्रँडिंग करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर पंच कमिटीचे ज्येष्ठ सदस्य तथा देवस्थानच्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख सोमशंकर देशमुख हेही पुढे सरसावले आहेत.
‘दासोह’मध्ये नोंदवल्या जातात प्रतिक्रिया...- श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या दासोह (अन्नछत्र) विभागात एक रजिस्टर ठेवण्यात आले आहे. दासोहमधील स्वच्छता, सेवेकºयांकडून भक्तांना मिळणारा सन्मान, प्रसादाच्या उत्कृष्ट चवीबद्दल रजिस्टरमध्ये प्रतिक्रिया वाचायला मिळतात. क्लास वन अधिकाºयांपासून ते निवृत्त अधिकारी, राजकारण्यांपासून ते सामाजिक कार्यकर्ते साºयाच भक्तगणांच्या प्रतिक्रिया वाचताना दासोह विभागातील अन्नदानाचे कार्य देश-विदेशात पोहोचल्याचे प्रखरपणे जाणवते. विभागाचे प्रमुख तथा पंच कमिटीचे सदस्य सिद्धेश्वर बमणी यांच्या दासोह विभागात आधीपासूनच भक्तांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर सोमशंकर देशमुख यांनी नव्या वर्षात सोडलेला संकल्प मंदिराचे ब्रॅण्डिंग होणार आहे, हेही तितकेच खरे.
यात्रेत ‘यशोधरा’ची तातडीची रुग्णसेवा- जिथे ग्रामदैवताची यात्रा भरते त्या मंदिर अन् गड्डा मैदानापासून हाकेच्या अंतरावर यशोधरा हॉस्पिटल आहे. यात्रेतील चार प्रमुख सोहळे आणि ३१ जानेवारीपर्यंत चालणाºया यात्रेत एखादी घटना घडली अन् त्यात जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी हॉस्पिटलमध्ये एक विभाग सतर्क राहणार असून, डॉक्टर आणि कर्मचाºयांची एक टीम कार्यरत राहणार आहे. यात्रेत रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. विजय शिवपुजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
यात्रेतील एखाद्या घटनेतील रुग्णास तातडीने दाखल करून घेतले जाईल. दाखल करण्याआधी अशा रुग्णाच्या नातेवाईकाकडे लगेच डिपॉझिट भरण्याची आवश्यकता नाही. देवस्थान पंच कमिटीने उतरविलेल्या विमा योजनेचा लाभ मिळून जाईल. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बसवराज कोलूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर चरणी सेवा करण्याची संधी मिळणार आहे.-डॉ. विजय शिवपुजे, पोटविकारतज्ज्ञ- यशोधरा हॉस्पिटल.