सोलापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबतची सोडत (लॉटरी) दिनांक ७ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. यात ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत निवड यादीत ज्यांची नावे आली आहेत त्या विद्यार्थ्यांना अकरा तारखेपासून प्रवेश देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या स्थितीवरून प्रवेश प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यात प्रवेश करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे याबाबतचा निर्णय शुक्रवारी होऊ शकतो असे मत अधिकार्यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यात यंदा २ हजार ३२१ जागांसाठी ४,२६२ अर्ज आले आहेत. यातील जवळपास सतराशे विद्यार्थ्यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया थांबली होती.
दरम्यान, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. प्रवेशावेळी रहिवासी पत्त्याचा पुरावा कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी, जर चुकीचे अंतर असल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देवू नये.
अशा पालकांना तालुकास्तरीय समिती/ शिक्षणाधिकारी
यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे
शाळेत संपर्क करावे असे आदेश देण्यात आले आहेत.