पंढरपूर : शहरातील कोविड १९ रूग्णांना उपचार देण्यासाठी अॅपेक्स हॉस्पिटल प्रशासनाने अधिग्रहन केले आहे. या अॅपेक्स हॉस्पिटलमधील ब्रदर आणि सिस्टर अशा दोन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून देखील ते दोघे हाॅस्पिटलमधील त्यांच्या कामावर हजर झाले नाहीत. यामुळे प्रांत कार्यालयातील नायब तहसिलदार विजय जमादार यांनी दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यामुळे कामास नकार देणाऱ्या त्या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाने शहरातील काही हाॅस्पिटलमधील डाॅक्टर, नर्सेस अाणि इतर स्टाफ यांची सेवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत अधिग्रहित केली आहे.
त्यापैकी पंढरपूर शहरातील अॅपेक्स हाॅस्पिटल मधील सिस्टर अंजना तिवरासे (रा. तारापूर ता.पंढरपूर) आणि ब्रदर आनंद ओहाळ (रा. शेटफळ ता.मोहोळ ) यांच्य़ाशी २७ जुलै पासून संपर्क करुन देखील हे दोघे त्यांच्या हाॅस्पिटल मधील अत्यावश्यक सेवेसाठी हजर झाले नाहीत. त्यांना नेमून दिलेल्या कामात गैरहजर राहून कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केली.
या कारणावरुन या दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रांत कार्यालयातील नायब तहसिलदार विजय जमादार यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्या वरुन पोलिसांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.