Sharad Pawar and Sushilkumar Shinde meet Vijaysinh Mohite Patil विठ्ठल खेळगी, सोलापूर/अकलूज: माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मागील पाच सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले अकलूजचे मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी खासदार शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते ह विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भेटीसाठी अकलूजमध्ये दाखल झाले आहेत.
मागील महिनाभरापासून मोहिते-पाटील काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपने माढा लोकसभेचे उमेदवारी पुन्हा एकदा रणजीत निंबाळकर यांना दिल्यानंतर मोहिते पाटील गटाकडून सुरुवातीपासूनच विरोध झाला. त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला शेवटपर्यंत यश मिळाल्याने धैर्यशील मोहिते-पाटील अखेर शरद पवार यांच्याकडून माढा लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दृष्टीने रविवारी सकाळपासूनच मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. सायंकाळी चार वाजता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यात मोहिते पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
तत्पूर्वी सकाळी शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते अकलूजमध्ये दाखल झाले आहेत. सकाळी १०:५० वाजता शरद पवार यांचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वागत केले तर ११.२० सुशिलकुमार शिंदे यांचे आगमन होताच नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांनी स्वागत केले. यावेळी बळिराम साठे, आ.जयंत पाटील, माजी आमदार धनाजी साठे, माजी आमदार नारायण पाटील, अभिजीत पाटील, संजय कोकाटे, जयमाला गायकवाड, अनिकेत देशमुख, शिवाजी कांबळे, भारत पाटील, रामहरी रुपनवर, संजय पाटील घाटणेकर, चेतन नरोटे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.