सोलापूर : रस्ते अपघाताची संख्या कमी करण्यासाठी चेन्नईच्या धर्तीवर सोलापुरात ‘आयरेड’ हा प्रकल्प राबविला जात आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना अमलात आणणे हा याचा उद्देश आहे. जेणेकरून अपघातांची संख्या कमी व्हावी. यासाठी पोलीस, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले. यासाठी ‘मोबाइल ॲप’चा वापर केला जातो.
रस्ते अपघातांवर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटेग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला. एनआयसी संस्था मोबाइल ॲपच्या माध्यमातून डेटा एकत्र करीत आहे. एकत्रित केलेला डेटा आयआयटी चेन्नईद्वारे विश्लेषण करण्याचे काम होत आहे. त्यामुळे अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे सोपे होणार आहे.
------
आयआरएडी हे ॲपचे प्रशिक्षण
आयआरएडी हे ॲप कसे वापरायचे, त्यात कोणती माहिती कशी सादर करायची, याबाबत कर्मचारी व अधिकाऱ्यांना एनआयसीतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. यात सोलापूर शहर व ग्रामीणचे पोलीस, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश होता. हे प्रशिक्षण वेब तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात आले.
----------
तज्ज्ञांच्या माध्यमातून होणार संशोधन
या प्रकल्पातून संकलित केलेल्या माहितीचे आयआयटी चेन्नई व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) याचे संशोधन व विश्लेषण करणार आहे. यावेळी अपघात झालेली ठिकाणे जसे रस्ते दुभाजक, उड्डाणपूल, रस्ते संरचना यांचा अहवाल संबंधित जिल्ह्यास पाठवून रस्ते अपघात रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात येणार आहेत.
----------
हे ॲप चालणार कसे :
अपघातानंतर सर्वप्रथम पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताचे फोटो व व्हिडिओ ॲपमध्ये अपलोड करायचे असतात. वाहनांचे किती नुकसान झाले ही माहितीही यात भरावी लागते. त्यानंतर आरटीओचे मोटार वाहतूक निरीक्षक घटनास्थळी पोहोचून वाहनासह अन्य काही दोष पाहून ती माहिती भरतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारीसुद्धा अपघाताच्या कारणांचा शोध घेतात. ही सर्व माहिती ॲपद्वारे रस्ता सुरक्षा विभागाकडे एकत्रित केली जाते.
-------
आयआरएडी ॲपचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ॲपच्या वापराने निश्चितपणे भविष्यात होणारे अपघात टाळता येऊ शकतात.
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.
-----------