मंगळवेढा/मल्लिकार्जन देशमुखे
गावची सुरक्षा ग्रामसुरक्षा दलाच्या हाती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील नागरिक सतर्क राहण्यासाठी प्राधान्याने प्रत्येक गावातील मंदिरावर सायरन व एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. याबाबत पोलीस अधिकारी स्वत: प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. स्थापना करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना मार्गदर्शन करून ती सक्रिय राहतील यासाठी उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे आपले गाव आपली सुरक्षा या पोलीस विभागाच्या संकल्पनेस सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्यात भेट दिली असता त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. लोकसंख्येच्या मानाने पोलीस विभागाकडे अपुरे कर्मचारी असल्याने लोकांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यास मर्यादा येतात. तंटामुक्त जिल्हा ही चळवळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून राबविण्यात आली. त्या संकल्पनेचे १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण झाले. गावातील ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना पोलिसांचा माणूस म्हणून ओळख मिळाली पाहिजे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसून गुन्ह्याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल. आपले गाव सुरक्षित राहील, असे सांगितले.
प्रत्येक मंदिरावर सायरन बसविल्यास संपूर्ण गाव अलर्ट राहिल तसेच चोऱ्या रोखण्यास मदत होईल. या संकल्पनेबाबत झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्यावतीने ग्रामपंचायतीना सूचित केले जाईल.आमचे पोलीस अधिकारी प्रत्येक गावात भेट देऊन याबाबत तातडीने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी हे महत्वाचे सणाचे दिवस असून याकाळात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. वाढत्या दुचाकी चोरी ही गंभीर समस्या असून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून टोळी जेरबंद करण्याची सूचना याप्रसंगी पोलिस अधीक्षक सातपुते यांनी केल्या.