सोलापूर : शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्कमंत्रीपदी मृद व जलसंधारमंत्री शंकरराव गडाख यांची गुरुवारी निवड करण्यात आली आहे. आगामी मनपा, जिल्हा परिषद निवडणुकांची रणनिती संपर्कमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आखली जाणार आहे. गेली अडीच वर्षे जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद तानाजी सावंत यांच्याकडे आहे. त्यात आता संपर्कमंत्री म्हणून गडाख यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पालकमंत्र्यांशी समन्वय, जिल्ह्यातील शिवसैनिकांची शासन दरबारातील प्रलंबित कामे करण्यासोबत राजकीय दादागिरीवरही शंकरराव गडाख लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती. विधानसभा निवडणुकीत सावंत यांनी शिवसेनेत नवी समीकरणे मांडली. करमाळा, शहर मध्य, मोहोळ यासह इतर मतदारसंघात मातोश्रीने निश्चित केलेल्या शिवसैनिकांची तिकिटे कापली. त्याचा फटका पक्षालाही बसला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उध्दव ठाकरेंनी तानाजी सावंत यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले. त्यामुळे नाराज झालेले तानाजी सावंत पुन्हा मातोश्रीवर पाऊल ठेवणार नाही, असे सांगून गेले. मात्र तरीही शिवसेनेत सक्रिय असल्याचे सोशल मिडीयातून दाखवून देत होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच पावसाळामुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यात सावंत यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. तानाजी सावंत यांचे जिल्हा संपर्कप्रमुपद कायम आहे की नाही याबद्दल सेनेचे नेते स्पष्टीकरण देत नाहीत. मात्र यादरम्यानच शंकरराव गडाख संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.