सोलापूर : सीआयडीचे उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी मंगळवारी रात्री उशिरा पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार घेतला. यावेळी शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्कालीन पोलीस आयुक्त हरिष बैजल हे सेवानिवृत्त झाल्यानंतर आयपीएस अधिकारी हिरेमठ यांची पोलीस आयुक्तपदावर अतिरिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
अवघ्या सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आज, ३१ मे रोजी पोलीस आयुक्त हरीश बैजल हे सेवानिवृत्त झाले. पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर १९९२ साली पहिले पोलीस आयुक्त म्हणून पी.पी. श्रीवास्तव हे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर आजतागायत १९ पोलीस आयुक्तांनी कार्यभार सांभाळला आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त रविंद्र शेनगावकर यांची बदली झाल्यानंतर दि.४ मे २०१७ रोजी त्यांचा फुलाने सजवलेल्या रथाची अधिकाऱ्यांनी दोरी ओढून निरोप दिला होता. सोलापुरात सेवानिवृत्त होणारे हरीश बैजल हे पहिले पोलीस आयुक्त असून त्यांचाही रथ ओढून अधिकाऱ्यांनी निरोप दिला.
शासनाने सध्या सर्व बदल्या थांबविल्या आहेत. ३० जूनपर्यंत बदल्या होणार नाहीत असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापुरात रिक्त होणाऱ्या पोलीस आयुक्तपदाबाबत प्रश्न निर्माण झाला होता. शासनाकडून नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत सुधीर हिरेमठ यांच्याकडे अतिरिक्त पदभार राहणार असल्याचे सांगण्यात आले.