सोलापूर : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर हा दीडशे किमीच्या एक्स्प्रेस हायवे ज्या शेती गटातून जाणार आहे, त्या शेती गटांचे प्रसिद्धीकारण पुढील आठ दिवसांत होईल. त्यानंतर हरकतींसाठी २१ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना हायवे बाबतीत हरकती आणि आक्षेप नोंदवता येईल. सुनावणीनंतर शेती गटांचे भूसंपादन होईल.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून बार्शी, उत्तर सोलापूरसह अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गट नंबर्स जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. लवकरच भूसंपादनासाठी नोटीस प्रसिद्ध होणार आहे. भूसंपादन अधिकारी अरुण गायकवाड या याबाबत लवकरच प्रक्रिया सुरू करणार आहेत.
सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉरचे भूसंपादन फास्टट्रॅकवर होणार असून, भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या कॉरिडॉरचे डीपीआर अर्थात डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्टदेखील अंतिम टप्प्यात आहे. सुरुवातीला अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गट नंबर्स भूसंपादन विभागाकडे सुपूर्द केले होते. आता बार्शी आणि उत्तर सोलापुरातील गट नंबर्सदेखील सुपूर्द केल्या आहेत. त्यामुळे लवकरच आता भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
गडकरी यांच्या दौऱ्याची तयारी
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे २५ एप्रिल रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते सोलापूर-विजयपूर तसेच सोलापूर-अक्कलकोट तसेच सोलापूर-सांगली महामार्गांचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.