सोलापूर : शहर आणि ग्रामीण भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत, अशा ठिकाणी अँटीबॉडीज टेस्ट करून समूह संसर्ग झाला आहे काय, याची खातरजमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन किटद्वारे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याची मोहीम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ८ हजार ३५० टेस्ट घेण्यात आल्या, त्यात ९०७ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण दहा टक्के आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळबरोबरच शहरात काही विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे समूह संसर्ग होतोय का, याचा शोध घेणे गरजेचे आहे. अद्याप तसे चित्र नसले तरी एकाच घरात व भागात दहा ते बारा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागात इतरांनाही लागण झाली होती का व झाली असेल तर त्यांच्यात प्रतिकार शक्ती असल्याने कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत का, याचा शोध घेण्यासाठी अँटीबॉडीज टेस्ट उपयुक्त ठरते.
दिल्लीमध्ये या टेस्ट घेण्यात आल्या आहेत. त्यातून समूह संसर्ग झाला आहे का हे दिसून आलेले आहे. या टेस्टमध्ये संबंधित व्यक्तीच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीजमुळे कोरोना येऊन गेला आहे काय, हे समजून येते. त्यामुळे अशा भागात अँटीबॉडीज टेस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. असे दहा हजार किट खरेदी करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. हे किट उपलब्ध झाल्यावर कोणत्या भागात या चाचण्या करायच्या हे ठरविले जाईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.
१७ कोटी खर्चाचे नियोजनराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेकडे १७ कोटी ४ लाखांचा निधी आला आहे. या निधीतून जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासाठी मनुष्यबळ, साहित्य खरेदी व उपचार केंद्रावर खर्च करायचा आहे. या अनुषंगाने तिन्ही विभागांची बैठक घेण्यात येणार आहे. महापालिका व जिल्हा परिषदेला मनुष्यबळासाठी हा निधी वापरता येईल. १४ कोटी मनुष्यबळ, २ कोटी ६४ लाखांचे साहित्य आणि ४० लाख उपचार केंद्रासाठी राखीव आहेत.
रुग्णालयाची केली पाहणीजिल्हाधिकारी शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि समितीतील सदस्यांनी खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन उपचार व बिलाच्या व्यवस्थेची पाहणी केली. कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असतील तर त्यांच्या बिलाची आकारणी कशी होते, याबाबत माहिती घेण्यात आली.