सोलापूर : पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यातील १९७ मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीने मतदान सुरू झाले. सकाळच्या सत्रात शिक्षक मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात 197 मतदान केंद्रांवर जवळपास 4 हजार 194 कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वत्र पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात आहे. मतदान वाढवण्याकरिता विविध पक्षातील कार्यकर्ते मतदारांना कार, रिक्षा आणि टू व्हीलरवर मतदान केंद्रावर घेऊन येत आहेत.
निवडणूक कार्यालयाकडून 197 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात आले आहे. तसेच स्वतंत्र व्हिडिओ ग्राफरद्वारे मतदान केंद्रातील प्रक्रियेचे चित्रीकरण देखील सुरु आहे. मतदान केंद्रावरील संपूर्ण प्रक्रिया जिल्ह्यातील तसेच पुणे विभागातील अधिकारी मतदान प्रक्रिया ऑनलाइन लाईव्ह बघत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता फिजिकल डिस्टंसिंगचे पालन होत आहे. तसेच ज्या मतदाराच्या तोंडावर मास्क नाही त्यांना मास्क दिली जात आहे. मतदान केंद्रावर तैनात कर्मचारी फेस शील्ड मास्क परिधान केले आहेत. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराची थर्मल मशीनद्वारे तपासणी सुरु आहे. त्यानंतर हातावर सॅनिटायझर दिला दिला जात आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ करिता जिल्ह्यातील 67 हजार सोलापूरकर मतदानाचा हक्क बजावतील. दोन्ही मतदार संघात एकूण पाच लाख मतदार आहेत. पदवीधर मतदार संघाकरिता 4 लाख 26 हजार 430 मतदार तर शिक्षक मतदारसंघ करिता 72 हजार 545 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ करिता 53 हजार 813 मतदार तर शिक्षक मतदारसंघ करता 13 हजार 584 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदार संघात एकंदर ६२ उमेदवार तर शिक्षक मतदार संघात ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये अपात्र असणाऱ्या व तोतयागिरी करणाऱ्या बनावट व्यक्तींवर प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात होईल.