सोलापूर: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात संचारबंदी लागू का करण्यात येत आहे अशी विचारणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत पवार यांना सविस्तर अहवाल सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.
सोलापूर शहर आणि बाजूच्या गावांमध्ये कोरणा संसर्ग वाढला आहे या पार्श्वभूमीवर कोरोना चा संसर्ग कमी करण्यासाठी संचारबंदी लागू करण्याची मागणी पुढे आली पालकमंत्री भरणे यांनी या मागणीला मंजुरी दिली त्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी १६ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असे दहा दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. यामध्ये बार्शी, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट शहरासह ३१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या संचारबंदीला काही कामगार संघटना, व्यापार्यानी सुरुवातीला विरोध केला होता. ही तक्रार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोलापुरात संचारबंदी लागू का केली याबाबत त्यांनी पालकमंत्री भरणे यांना विचारणा केल्याचे सांगण्यात येत आहे.
पालकमंत्री भरणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना शहराभोवतीच्या पाच तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर जिल्हा आरोग्य विभागात कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा अहवाल तयार करण्याची धावपळ सुरू होती.