मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
भीमा व माण नदीवरून होणाऱ्या वाळूच्या चोरीला व वाहतुकीला आळा बसवण्यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी नायब तहसीलदार, तलाठी व कोतवाल यांचा समावेश असणारी सात भरारी पथके तयार केली आहेत . त्यामुळे रात्रभर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला ब्रेक लागणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात माण व भीमा नदीतुन रात्री अवैध वाळू उपसा होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. तहसीलदार यांच्या परस्पर काही मंडळ अधिकारी व तलाठी , पोलीस यांनी वाळू चोराशी आर्थिक हातमिळवणी करीत वाळू चोरीचा उद्योग सुरू ठेवला होता. याबाबत तहसीलदार रावडे व प्रांताधिकारी यांच्याकडे महसूल मधील काहींच्या तक्रारी ही माण नदीकाठच्या नागरिकांनी केल्या आहेत मात्र ते अधिकारी अजून ठाण मांडून आहेत. त्यामुळे वाळू उपशाला म्हणावासा ब्रेक लागला नव्हता.
महसूल अधिकाऱ्यावर वाढते हल्ले व सध्या वाळू लिलाल नसतानाही रात्रीं चोरून होणाऱ्या वाळू उपसा रोखण्यासाठी शासनाने अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरता वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. तरीही गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या काही घटना शासनाच्या निदर्शनास येत आहे. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारीच्या पडताळणीसाठी आणि आकस्मिक तपासणीसाठी महसूली विभागनिहाय राज्यस्तरीय दक्षता व निरीक्षण पथक स्थापन करण्यात आहे आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तात्काळ जिल्ह्यातील तहसीलदार यांना एका पत्राद्वारे पथके नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तहसीलदार यांनी सात पथके स्थापन केली आहेत.
सदर पथक भीमा, माण नदी परिसर फिरणार आहे. या पथक प्रमुखाचा मोबाईल नंबर प्रसिद्ध केला आहे, नागरिकांनी वाळू चोरी बाबत या मोबाईल नंबर वर कॉल करून माहिती द्यावी त्याची दखल घेऊन दंडात्मक कारवाई, गुन्हे दाखल करून मालमत्ता जप्त केली जाईल असे पत्राद्वारे सूचित केले आहे. वाळू चोरी रोखणे हे महसूल चे काम आहे असे समजून पोलीस विभानेही काही दिवस लक्ष देऊन पुन्हा याकडे दुर्लक्ष केले आहे तरी आता महसूल बरोबर पोलीस अधिकारी यांनाही या वाळू चोरी रोखण्याकामी महसूल विभागाला मदत करावी लागणार आहे. या फिरत्या पथकाने वाळू चोरी रोखण्यास मदत होईल मात्र तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी माण व भीमा नदीकाठच्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांची खांदेपालट केल्यास या मोहिमेला मोठे यश मिळेल अशा नदीकाठच्या नागरिकांतुन प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.