सोलापूर : इटली या देशातील कारखान्याच्या आधुनिक मशिनरी घेऊन देतो असे सांगून निवृत्त सहायक पोलीस आयुक्त यांना पंधरा लाख रुपयाला फसवल्याप्रकरणी एकाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पैसे घेऊन टाळाटाळ केल्याने फिर्याद दिली आहे.
राजन नाडार ऊर्फ राजन पुजारी ऊर्फ पी. राजन (रा. मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रामचंद्र बुमय्या यन्नम (वय ७०, रा. ३४/१४ ए, न्यू पाच्छा पेठ, चिप्पा मार्केटजवळ, अशोक चौक, सोलापूर) हे १९९५ साली मुंबई शहरातील दहीसर पोलीस येथे पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून कार्यरत होते. दरम्यान, टेक्स्टाईल मशिनरीचा दलाल राजन नाडार याच्यासोबत रामचंद्र यन्नम यांची ओळख झाली. राजन नाडार याने मी सोलापुरातील कारखानदारांना टेक्स्टाईलच्या मशिनरींचा पुरवठा केला आहे. तुम्हीही कारखाना चालू करा मी मशिनरी देतो असे सांगितले. रामचंद्र यन्नम यांनी विश्वास ठेवून होकार दिला.
१९९६ साली सिमको कंपनीच्या पॉवर लूम आणून कारखाना उभा करून दिला. हा कारखाना रामचंद्र यन्नम यांच्या पत्नी पुष्पलता व भाऊ दिनेशने चालू केला. दरम्यान, राजन नाडार व रामचंद्र यन्नम यांच्यात चांगली मैत्री झाली. २००५ साली राजन याने मो. टेक्स इंटरप्रायजेस या नावाने मुंबई न्यू एम्पायर सोसायटी कोंडीविटा अंधेरी पूर्वमध्ये स्वत:चे आॅफिस सुरू केले. तो परदेशातील मशिनरी आयात करून भारतातील कारखानदारांना विकत होता. दरम्यान, रामचंद्र यन्नम हे ३१ डिसेंबर २००६ रोजी सहायक पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले.
२०१५ मध्ये राजन नाडार याने रामचंद्र यन्नम यांना आपल्या कारखान्यातील मशिनरी जुन्या झाल्या आहेत. परदेशी बनावटीच्या आधुनिक मशिनरी बदलून ३० लाख रुपयात दुसºया नवीन बसवण्याचा सल्ला दिला. प्रथमत: रामचंद्र यन्नम यांनी नकार दिला मात्र त्याने इटली येथील पॉवर लूमचा कारखाना बंद पडला आहे, तेथील मशिनरी आधुनिक असून त्या १५ लाखात मिळवून देतो असे सांगितले. रामचंद्र यन्नम यांनी विश्वास ठेवून होकार दिला. वेळोवेळी रोख स्वरुपात १५ लाख रुपये घेतले; मात्र काही दिवसांनी तो टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामचंद्र यन्नम यांनी राजन नाडार याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
२१ वर्षांच्या मैत्रीनंतर दिला दगा- राजन नाडार याने रामचंद्र यन्नम यांच्यासोबत १९९५ सालापासून मैत्री केली होती. मैत्रीमध्ये रामचंद्र यन्नम यांचा चांगला कारखानाही उभा राहिला; मात्र आधुनिक मशिनरी घेऊन देतो म्हणून १५ लाख रुपये घेतले; मात्र इटली येथील कारखान्यासोबत झालेला करार रद्द झाला असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. शेवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अन् एकवीस वर्षांच्या मैत्रीनंतर रामचंद्र यन्नम यांना दगा दिला.