रवींद्र येसादे- उत्तूर -सनई-चौघडा, पै-पाहुण्यांची रेलचेल, आगत-स्वागत, लिंगायत धर्म संस्कृती अनुसार बसवेश्वर महाराजांनी घालून दिलेल्या रूढी, परंपरेनुसार उत्तूर (ता. आजरा) येथील डॉ. भालचंद्र तौकरी यांच्या चिरंजीव व कन्या यांच्या विवाह सोहळ्यातील कार्यक्रम महिलांनीच पूर्ण केला. गडहिंग्लज येथील गणेश मंगल कार्यालयात डॉ. समीर यांचा विवाह डॉ. सारिका (रा. हिसूक वडगाव, जि. बीड) हिच्याशी, तर कन्या चि. सौ. का. सम्रीता हिचा विवाह चि. ओमकारेश्वर बटकडली (रा. आजरा) यांच्यासोबत विधीवतपणे साजरा करण्यात आला.संपूर्ण लग्नविधीचा कार्यक्रम महिलाच करणार असल्यामुळे विवाहाला एक वेगळेपण होते. विवाहाची पद्धत कशी असणार याची माहिती पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांना उत्सुकता होती.लग्नसमारंभ कसा असावा, अक्षता का नको, अन्नाची नासाडी न करता फुलांचा वर्षाव का करावा याबाबतची माहिती महिला प्रदेश काँगे्रस कमिटीच्या उपाध्यक्ष सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके , चि. यश आंबोळे यांनी आपल्या अनुभवातून माहिती दिली.म. बसवेश्वरांनी लग्नाची पद्धत कशी असावी, स्त्री-पुरुष समानता कशी असावी, याबाबतची माहिती धारवाडच्या बसव केंद्राच्या सविता नडकट्टी यांनी दिली व भगिनी मंडळींनी म. बसवेश्वरांवरील गीते, दोहे यातून नातेवाइकांना संदेश दिला.सकाळी ११.३० पासून विधीला सुरुवात झाली. लग्नमंडपातील सर्व विधी पार पडल्यानंतर १ वाजता विवाहस्थळी वधू-वरांना बोलावण्यात आले. कल्याण महोत्सवाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कल्याण महोत्सवासाठी वधू-वर येत असताना त्यांचे स्वागत करण्यात आले. मंडपात आल्यानंतर शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या अतिथींनी जोरदार स्वागत केले.वधू-वरांकडून म. बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून कल्याण महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. प्रथम वधू-वरांनी वचन प्रार्थना घेतली. पती-पत्नीने कसे वागले पाहिजे, संसार कसा केला पाहिजे हे वदवून घेतले. त्यानंतर गौरव समर्पण, आशीर्वचन, भावोदक सिद्धता आणि प्रोक्षण विभुती धारणा, रूद्राक्षधारणा, वचनगंठण, प्रतिज्ञावचन, वचनमांगल्य व रूद्राक्षमांगल्यधारणा आदी विधी महिलांनी पूर्ण केल्या.विवाहस्थळी ८ मंत्रांचा उच्चार करून अक्षताऐवजी वधू-वरांवर फुलांचा वर्षाव आई-वडिलांकडून करण्यात आला. त्यानंतर वधू-वर स्टेजवरून खाली आल्यानंतर सर्वांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.या साऱ्या कामाचे सूत्रसंचालन जयश्री तोडकर, अशोक भोईटे यांनी केले. या आगळ्या-वेगळ्या विवाह सोहळ्यास आजरा, गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव, कोल्हापूर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाहास अॅड. श्रीपतराव शिंदे, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, जि.प.सदस्य उमेश आपटे, वसंतराव धुरे, अशोक चराटी, अनंतराव आजगावकर, बी. जी. पोतदार आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता हरिद्रालेपण हा विधी झाला.५सर्व विधी मराठीतूनच !विवाह सोहळ्यातील सर्व विधी मराठी भाषेतून झाले. क्रियाविधी करणाऱ्या या महिला कर्नाटकातील धारवाड येथील होत्या. त्यांनी मराठी भाषा समजून घेऊन विधी शांततेत पार पडला.गडहिंग्लज येथे डॉ. समीर व डॉ. सारिका आणि सम्रीता व ओमकारेश्वर बटकडली या नवविवाहितांच्या हस्ते ध्वजारोहण करून विवाहसोहळ्याचा प्रारंभ झाला.
वधू-वरांवर अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव
By admin | Published: December 16, 2014 12:33 AM