सांगोला : कोरोना संसर्गामुळे २५ लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी असताना, वधू-वर पित्यांनी १०० ते १५० वऱ्हाडी जमवून वधू-वरांचा विवाह लावला. मात्र, पोलिसांना या विवाह सोहळ्याची गुप्त माहिती मिळताच तेथे छापा टाकून नववधू-वरासह पित्यांची वरात थेट पोलीस स्थानकाच्या दारात जावून पोहोचली. शनिवारी चिकमहूद अंतर्गत बंडगरवाडी (ता. सांगोला) येथे ही घटना उघडकीस आली.
याबाबत पोलीस लक्ष्मण बापू वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता शामराव बंडगर, शामराव बिरा बंडगर, राहुल शामराव बंडगर (वर) (रा. चिकमहूद) तर अर्जुन तातोबा अनुसे, उषा अर्जुन अनुसे व सोनाली अर्जुन अनुसे (वधू) (सर्व रा. कटफळ), बाळासाहेब मच्छिंद्र बंडगर, बापू सिदा बंडगर, अण्णासाहेब रामचंद्र तांबवे (सर्व रा. चिकमहूद), धनाजी महादेव नारनवर (रा. महिम, ता. सांगोला) अशी गुन्हा दाखल झालेल्या वधू-वर पिता, नववधू-वरासह वऱ्हाडींची नावे आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विवाह सोहळा २५ लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केले आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून कोरोनाचे कडक निर्बंध असताना चिकमहूद व कटफळ येथील वधू-वर पित्यांनी १०० ते १५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा चालू ठेवल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना मिळाली. त्यांच्या आदेशान्वये फौजदार प्रताप वसगडे, सहाय्यक फौजदार संजय राऊत, हवालदार आप्पासाहेब पवार, वाघमोडे, सावंत, बंडगरवाडी व महूदचे पोलीसपाटील यांनी विवाह सोहळ्याच्या ठिकाणी अचानक छापा टाकून वर-वधू पित्यासह नववधू, वऱ्हाडींना ताब्यात घेऊन कारवाई केली.
----
...तर कठोर कारवाईचा इशारा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. जर कोणी नियम मोडून विवाह सोहळा, अर्धवट शटर उघडून व्यवसाय चालवणे, तोंडाला मास्क न लावता विनाकारण रस्त्यावर फिरणे अशाप्रकारे वागत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिला आहे.