सोलापूर : सोमवारी सायंकाळी व मंगळवारी पहाटेच्या सुमारास सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अकलूज-सांगोला राज्य महामार्ग क्रमांक ७१ वरील घुमेरा ओढ्याला मोठया प्रमाणात पाणी आले आहे. या पाण्यामुळे पुलाचा काही भाग खचल्याने म्हसवड-पंढरपूर रस्त्यावरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे़ यामुळे शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. अशातच सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस मंगळवारी पहाटे सहापर्यंत जोरदारपणे कोसळत होता. त्यामुळे सांगोला, पंढरपूर, माळशिरस भागातील बहुतांश ओढयाला मोठया प्रमाणात पाणी आले आहे. अशातच अकलूज-सांगोला राज्य महामार्ग क्रमांक ७१ वरील घुमेरा ओढ्याला मोठया प्रमाणात पाणी आले आहे़ या पाण्यामुळे पुलाचा काही भाग खचल्याने म्हसवड-पंढरपूर रस्त्यावरील वाहतुक पूर्णपणे बंद केली आहे़ यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे.