सोलापूर : पाऊसमान कमी झाले की लोक पाणी... पाणी करायचे. अशा तीव्र टंचाईच्या काळात तहान भागवून जीवात जान आणली. मतदारांनी नेमकी ही जाण ठेऊन मतदान केल्यामुळे मदत करणारी नेमकडी मंडळी निवडून आल्याचं निकालातून स्पष्ट झाले आहे. मात्र पाणी देणाऱ्या काहींना नाकारल्याचेही दिसत आहे.
तळेहिप्परगा, बीबीदारफळ व भागाईवाडी, हगलूर या गावांत पाणी या विषयावरच सत्तांतर झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा गावात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकरुख तलावालगतच्या तळेहिप्परगा गावातही पाण्याची तीव्र समस्या आहे. येथील माजी सरपंच स्व. लक्ष्मण भिंगारे यांची तलावालगत शेत-जमीन आहे. गावातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्यांची मुले कुमार व सचिन यांनी सोलापूर-तुळजापूर रस्त्यालगतच्या भागात स्वखर्चाने पाईपलाईन केली. पाणीपुरवठा करण्यासाठी एक कर्मचारीही नियुक्त केला. याशिवाय अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी १८५ दिवे लावले. स्वत:चे धान्य दुकान असल्याने अडचणीतील कुटुंबांना वेळोवेळी मोफत धान्य दिले. शिवाय कोरोनाच्या कालावधीत ५०० कुटुंबांना किट दिले. याची जाण ठेवत नागरिकांनी सचिन व रोहन, चुलते, पुतणे शिवाय सत्ताच भिंगारे-पाटील-कांबळे यांच्याकडे दिली.
बीबीदारफळ येथेही पाणीटंचाईच्या काळात खासगी दोन बोअरचे पाणी मिळाल्याने सत्ताधाऱ्यांचे दोन उमेदवार पराभूत झाले. गेल्या १५ वर्षांपासून जमिनीतील पाणी मोफत बघून अनेकांची शेती बागायती करणाऱ्या तुकाराम साठे यांना पराभूत व्हावे लागले.
कुणी ठेवली कुणी नाही ठेवली...
भागाईवाडीत सत्ता गमवावी लागली. मात्र स्वतः पाणी फौंडेशनच्या कामाच्या बळावर कविता घोडके विजयी झाल्या. हगलूर येथे गेल्या आठ-दहा वर्षांपासून तुकाराम नवले हे संभाजीनगर या विस्तारित भागाला स्वतःच्या बोअरचे पाणी पुरवतात. मात्र त्यांचा १५ मतांनी पराभव झाला. यामुळे मोफत पाणी दिल्याची जाण काहींनी ठेवली, तर काहींना मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे.