सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याला ७१ वर्षे पूर्ण झाली तरी भटक्या समाजाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत़ रेणके आयोगाच्या अहवालानुसार प्रत्येक राज्यात भटका समाज विखुरला आहे़ उलट त्यांच्यापुढील प्रश्न वाढत चालले आहेत़ त्यांची आंतरिक आणि बाह्य कारणे तपासली पाहिजेत़ त्यांचे प्रश्न राष्ट्रीय अजेंड्यावर आणले पाहिजेत. त्याशिवाय विकास होणे शक्य नसल्याचे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले़
राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सातवे महाराष्ट्र राज्य अधिवेशन हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडले़ या अधिवेशनाचे उद्घाटन भटक्या विमुक्तांचे अभ्यासक, ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते झाले़ यावेळी अ़ भा़ धनगर समाज महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड, भटक्या विमुक्तांचे अभ्यासक प्रशांत पवार, भटक्या विमुक्त जमातीचे राज्य अध्यक्ष अमीनभाई जामगावकर, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड, राष्ट्रीय भटक्या विमुक्त मोर्चाच्या प्रसारक सुनीता राठोड, डॉ़ अजीज नदाफ, वडार समाजाचे अध्यक्ष शिवलिंग सुकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव, जात पडताळणी कार्यालयाचे नागेश चौगुले, छप्परबंद समाजाचे इब्राहीम विजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती़
मेश्राम यांनी स्वातंत्र्य चळवळीचा संदर्भ घेत ही चळवळ स्वातंत्र्यासाठी नव्हती तर ती ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याची होती, असे म्हणाले़ इंग्रजांचे गुलाम होण्यापूर्वी आपण सारे ब्राह्मणांचे गुलाम होतो़ आता ब्राह्मण सत्तेवर आले आहेत़ आता ब्राह्मणांकडून भटक्या समाजाला स्वातंत्र्य मागावे लागणार आहे़ जे लोक चपराशी बनू देत नाहीत, ते स्वातंत्र्य काय देणार? असा सवाल त्यांनी केला़ या देशात पाच राष्ट्रीय पक्ष हे ब्राह्मणांचेच आहेत़ निवडणूक आयोगाने बसपाच्या मायावती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना नोटीस बजावली आहे़ आपली मतसंख्या घटतेय़ पक्षाची मान्यता का रद्द करू नये? अशी विचारणा केली आहे़ यावेळी नागनाथ चौगुले, सुनीता राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले़
फसवणूक करणाºया सरकारला घरी पाठवा : गायकवाडउद्घाटक म्हणून बोलत असताना, महाराष्ट्र सरकारने भटक्यांच्या विकासासाठी साधं एक हजाराची बजेट तरतूद करत नाही, या समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे़ त्यांना घरी पाठवा, असे आवाहन उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी केले़ भारतातील गिरण्यांमध्ये सर्वाधिक रोजगार आणि आरक्षण हे भटक्यांना मिळाले़ १९०९ ते १९१३ काळात भटक्यांसाठी इंग्रजांनी स्वतंत्र बजेट देऊन कौशल्य प्रशिक्षण दिले होते़
बारामतीत इतका मोठा समाज स्थायिक झाला असताना बारामतीकरांनी त्यांचा विकासच केला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली़ भटक्यांसाठी इंग्रजांनी १९१३ मध्ये सुरू केलेले सोशल वेल्फेअर १९७३ ला बंद केले़ अडीच कोटी भटक्यांना आजही गुन्हेगार समजले जातात़ महाराष्ट्रात भटक्यांना एससी प्रवर्गात जाणीवपूर्वक घातले नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी के ला़