भीमा नदीवर असलेला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असलेला डिकसळचा पूल धरणातील पाणी मायनसमध्ये गेल्याने उघडा पडला आहे. बुधवारी सकाळी करमाळा तालुक्यातील टाकळी, कोंढारचिंचोली व कात्रज भागातील कार्यकर्ते सुहास गलांडे व डॉ. गोरख गुळवे, नागनाथ लकडे यांनी पश्चिम भागातील काही नागरिकांसह समक्ष जाऊन पाहणी केली असता त्यांना ही गोष्ट निदर्शनास आली.
ज्या बाजूला दगड निखळले आहेत, त्याच्या बाजूला पुलावर दगड टाकून तो रस्ता त्या बाजूला वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पुलाचे दगड ज्या बाजूने निखळले आहेत, त्या बाजूने वाहतूक करू नये, असे आवाहन केले आहे.
डिकसळ पूल ब्रिटिशकालीन असून, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिटही झाले आहे. भीमा नदीवरील हा पूल सोलापूर व पुणे, अहमदनगर या तीन जिल्ह्यांना जोडणारा असून या पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. याशिवाय, साखर कारखाने सुरू असताना या पुलावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणारी वाहने ये-जा करतात.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत करमाळा तालुक्यातील कोर्टी ते टाकळी रस्ता चांगला झाल्यामुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील सर्व वाहने या पुलावरून पुण्याला जातात. या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
---
१९करमाळा-डिकसळ पूल
डिकसळ पुलाचे वरील भागातील दगड निखळल्याचे दिसत आहे.
---