करमाळा : पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर इंदापूर तालुक्यातील भिगवण व करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली-डिकसळ शिवारातील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल उजनी धरणातील पाणी कमी झाल्याने उघडा पडला आहे. हा उघडा पडलेला ऐतिहासिक दगडाने बांधलेला मजबूत पूल पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर धरणाच्या पाण्यात अनेक पुरातन वास्तू, रस्ते, पूल बुडाले आहेत. भीमा नदीच्या पात्रावर ब्रिटिश काळात रेल्वेसाठी बांधलेला हा पूल उजनी धरणाच्या निर्मितीनंतर पाण्यामुळे बुडाला आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वजा झाल्यानंतर या पाण्यात बुडालेल्या वास्तू व त्याचे अवशेष दिसू लागतात. उजनी धरणातील पाणी खालावल्यानंतर हा ब्रिटिशकालीन पूल पूर्णपणे उघडा पडला आहे. ब्रिटिशांच्या काळात दळणवळणाच्या सोयीसाठी हा पूल निर्माण करण्यात आला होता. उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी असले की हा पूल पाण्याने वेढलेला दिसतो. सध्या धरणातील पाणी कमी झाल्याने पुलाखाली केवळ मूळ भीमा नदीपात्रातील पाणी दिसत आहे. भिगवणपासून ५ कि.मी. अंतरावरील या पुलामुळे करमाळ्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना पुणे जिल्ह्याशी संपर्क ठेवणे सुलभ बनले आहे. या पुलाचे बांधकाम पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. अनेक वर्षांनंतर हा रेल्वे पूल पूर्णत: दिसत असल्याने पूल पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे
. ----------------------------
सोलापूर-पुणे जिल्ह्याला रेल्वे पूल ब्रिटिशांच्या काळात सोलापूर-पुणे जिल्ह्याला जोडणारा रेल्वे पूल म्हणून याचा वापर होत असे. उजनी निर्मितीनंतर हा पूल पाण्यात लुप्त झाला. ब्रिटिशकालीन असूनही मजबूत बांधणीमुळे या पुलाचा वापर सुरूच राहिला. सध्याही या पुलावरून वाहतूक सुरूच असली तरी सुरक्षितता म्हणून जड वाहनांना या पुलावर प्रवेश बंदी आहे. यामुळेच हा पूल मध्यंतरी मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येते.