करमाळा / अकलूज : अकलूजचे मोहिते-पाटील अन् निमगावचे शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष आता नव्याने सांगण्याची गरज नाही. आता उजनी जलाशयाच्या पर्यटन केंद्रांच्या निधीवरुन दोन्ही घराण्यात श्रेयवाद रंगला आहे. करमाळ्यात बसून आमदार संजयमामा शिंदे यांनी निधी मंजूर करुन आणल्याचे सांगितले तर दुसरीकडे अकलूजच्या शिवरत्नवरुन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करुन आपणच निधी मंजूर करुन स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उजनीच्या बोटीवरुन ‘मामा विरुद्ध भैय्या, अशीच ताता थैय्या सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
उजनी धरण जलाशयाच्या परिसरात ४३ हेक्टर क्षेत्रावर पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ६ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. उजनी जलाशयाची सीमा ही पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात आहे. या विस्तीर्ण जलाशयात पाण्याचा मृतसाठा हा ६३ टीएमसी इतका असल्याने येथे पाणी सतत शिल्लक असते. या जलाशयावर पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. येथे फ्लेमिंगोसह विविध परदेशी पक्षी प्रतिवर्षी येत असतात. पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी असते. मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध असल्याने पक्षी या जलाशयाकडे आकर्षित होतात. येथे सध्याही पर्यटन सुरूच आहे. अनेकांनी आपल्या खासगी बोटी यासाठी तैनात केल्या आहेत.
या परिसरात चांगले पर्यटन केंद्र उभारण्याची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडली गेली होती. आघाडी सरकारच्या काळात अधिका-यांनी जलाशयाची पाहणी करून याबाबतचा अहवाल ही तयार केला होता. मात्र नंतर यास फारशी गती मिळाली नाही. नंतरच्या काळात उजनी जलाशयावर सर्वात मोठा सोलर प्रकल्प राबविण्याची तयारी फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आली होती. विस्तीर्ण जलाशयावरच सोलर पॅनल उभारण्याचा मानस होता. मात्र या योजनेलाही नंतर ब्रेक लागला होता.
आता महाराष्ट्र विकास महामंडळाच्या मदतीने वन विभागामार्फत बीओटी तत्त्वावर पर्यटन केंद्र विकसित करण्याचे काम होणार आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी धरण परिसराची पाहणी केली होती. पर्यटन केंद्र उभारण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. याला आता मूर्तस्वरूप प्राप्त होत आहे.
----बीओटी तत्त्वावर चालविण्यास देणार
या पर्यटन केंद्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीमधूनही निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पर्यटन केंद्र सज्ज झाल्यानंतर ते बीओटी तत्त्वावर देण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्रामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतील. त्यानंतर त्या परिसरात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. पर्यटकांच्या दृष्टीने सर्वसमावेशक असे पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले.
----पर्यटनमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा
२८ फेब्रुवारी २०२१ रोजी वांगी (ता. करमाळा) येथे उजनी बॅकवाॅटरमध्ये नौकाविहार करत असताना नाविकाचे नियंत्रण सुटल्याने बोट उलटून अकलूज येथील पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यानंतर आपण त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटन केंद्रीत विकास व्हावा, यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. १ मार्च २०२१ रोजी पर्यटमंत्र्यांना पत्रही पाठविले होते. त्यामुळेच आता निधी उपलब्ध झाल्याचे भाजपाचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
-----