भोपसेवाडी-जवळा येथील अशोक बाळू कोळेकर, त्यांचे चुलते किसन कोळेकर, संजय कोळेकर या तिघांनी चार वर्षांपूर्वी शेतीच्या पाण्यासाठी सामाईक बोअर घेतला होता. सर्वजण आळीपाळीने शेतीला पाणी देत होते. अशोक कोळेकर यांचा भाऊ वसंत कोळेकर यास दारुचे व्यसन असल्याने तो कोणासोबत ही भांडण करीत असे. २७ मे रोजी अशोक हा घराशेजारी शेतात पिकाला पाणी देण्यास गेला होता. त्यावेळी वसंत कोळेकर हा दारु पिऊन भावजयीला तुझा नवरा अशोक कुठे गेला, त्याला बोलावून घे असे म्हणून शिवीगाळ करू लागला.
भांडणाचा आवाज ऐकून अशोक घराकडे पळत आला. त्यावेळी अशोक याने भाऊ वसंत यास तू भांडण का करतो, असे विचारले असता त्याने मी आता तुझ्या सामाईक बोअरवेलमधील हिस्स्यासाठी पैसे देतो, मला हिस्सा दे असे म्हणाला. यावेळी अशोकने त्यास तुला त्यावेळी पैसे भरुन हिस्सा घे म्हटले होते. परंतु तू हिस्सा घेतला नाही, आता मी तुला हिस्सा देऊ शकत नाही असे समजावून सांगत होता. त्यावेळी वसंत कोळेकर याने तुम्हाला खाऊन लय मस्ती आलीय असे म्हणून भाऊ अशोक याच्या डोक्यात पाठीमागे मारुन जखमी केले. सदरचे भांडण अशोकची पत्नी उज्वला सोडविण्यासाठी मधे आली असता त्याने तिलाही तू मधे यायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून संजय कोळेकर, रंजना कोळेकर, धनाजी गावडे, सागर कलशेट्टी यांनी भांडण सोडविले. याबाबत अशोक बाळू कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वसंत बाळू कोळेकर याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.