सोलापूर : आजारी पडलेल्या वडिलांच्या उपचारासाठी त्याने बहिणीच्या लग्नासाठी साठवून ठेवलेले सर्व पैसे खर्च केले. रविवारी सायंकाळी जेवण केलेल्या वडिलांचा सोमवारी दुपारी मृत्यू झाल्याचे ऐकून त्याला धक्काच बसला. अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकºयाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सुलतानपूर येथील ५० वर्षीय शेतकरी आजारी पडल्याने त्यांच्या मुलाने २० आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजता सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना न्यूमोनियाचा आजार झाल्याचे सांगितले. त्यामुळे या आजारातून वडिलांना बरे करण्यासाठी त्याने बहिणीच्या लग्नासाठी साठवून ठेवलेले पैसे खर्च केले. २३ आॅगस्ट रोजी रुग्णालयाने त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना कोरोना वॉर्डात हलविण्यात आले. उपचारास दाखल केल्यानंतर श्वासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
दररोज सायंकाळी ते मुलाला मोबाईलवर संपर्क साधून माझी तब्येत ठीक आहे. मी जेवण केले आहे. काळजी करू नका. तुम्ही जेवण करा, असे सांगत होते. रविवारी सायंकाळी त्यांनी मुलाला फोन केला, मी आताच जेवण केले आहे, माझी काळजी करू नका. तुम्हीही जेवण करून घ्या, असे सांगितले. त्यानंतर सोमवारी दुपारी वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुलगा रुग्णालयात आला. चौकशी केल्यानंतर डॉक्टरांनी ते मरण पावल्याचे सांगून व मृतदेह ताब्यात घेण्यासाठी उर्वरित एक लाख आठ हजारांचे बिल जमा करण्यास सांगितले.
आधीच्या उपचारासाठी दोन लाख बिल जमा केल्यानंतरही डॉक्टरांनी आणखी मोठे बिल भरण्यास सांगितल्याचे पाहून त्याने एका सामाजिक संघटनेची मदत घेतली. संघटनेचे कार्यकर्ते आल्यावर डॉक्टरांनी नमती भूमिका घेत मृतदेह महापालिकेच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे खर्च करूनही वडिलांचे तोंड न पाहायला मिळाल्याने त्या मुलाला रडू कोसळले.