सांगोला : दुचाकी रेस करून आरडाओरड केल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन चुलत भावांनी मिळून तुमचा कायमचा विषय मिटवतो, असे म्हणत चुलत भावाच्या डाव्या बरगडीत गुप्तीने भोसकले. तसेच इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
लखन राजू चव्हाण असे जखमीचे नाव असून रविवार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३०च्या सुमारास सांगोल्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. लखन चव्हाण, प्रवीण भोरकडे, साहिल इनामदार हे तिघे जण रविवारी सायंकाळी शिवाजी चौकात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अचानकपणे भावकीतील ऋषिकेश नामदेव चव्हाण हा त्यांच्या समोर दुचाकीची रेस करून आरडाओरड करू लागला. त्यावेळी लखन चव्हाण याने त्यास विनाकारण दुचाकी रेस का करतो म्हणाला. त्याने तुला बघून घेतो असे म्हणून दुचाकीवरून तेथून निघून गेला. त्यानंतर थोड्या वेळाने तो सोबत खंडू चव्हाण, संग्राम चव्हाण यांना घेऊन आला. संग्राम चव्हाण यांनी हातामध्ये तलवार व ऋषिकेश चव्हाण यांच्या हातामध्ये गुप्ती होती. ऋषिकेश चव्हाण याने लखनला तुझ्या घरचे आम्हाला विनाकारण शिवीगाळ करतात, तुमचा विषय एकदाच मिटवतो म्हणत डाव्या बरगडीवर गुप्तीने वार केले. तसेच संग्राम चव्हाण व खंडू चव्हाण यांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुचाकीवरून पसार झाले. अजिंक्य माने याने जखमी अवस्थेत लखन चव्हाण यास सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.